गटारी अमावास्या
- Aug 7, 2021
- 4 min read
"गटारी अमावास्या"
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला "आषाढी अमावस्या" किंवा "दीप अमावस्या" असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरु होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे. या दिवसाचं महत्व काय?, दिव्यांची पूजा कशी करावी? या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं? याची शास्त्रीय उत्तरे शोधू या.
आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या.
घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.
पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांची पूजा करावी.आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते
आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी
गोडाचा नैवेद्य अर्पण करावा.आपल्या घरातील लहान मुलाचे औक्षण करावे.दूर्वा ही वंश वृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करा.या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात
त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते.पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.
‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्|
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥
(अर्थ: ‘‘हे दीपा,तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस.तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस.माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’)
"तमसो मा ज्योतिर्गमय" ही वैदिक धर्मातील सर्वात महत्वाची प्रार्थना ! तिचा अर्थ आहे "मला अंधारातून प्रकाशाकडे" ! म्हणजे कशाकडे ने ? उद्रेक झालेल्या "ज्वालामुखी" कडे ने.म्हणजे काय होईल ? मला नदीचा उगम सापडेल.सुपीक जमीन गवसेल.त्यामुळे माझी "ऊदरभरणा" ची सोय होईल.त्यामुळे मी जिवंत राहिन. इतका सोपा वैज्ञानिक अर्थ आहे या प्रार्थनेचा !
हे विज्ञान जनसामान्यांच्या आवाक्यात यावे यासाठी त्याला खालील "कथा स्वरूप" दिलेले दिसते.ही "दिव्यांची कहाणी" लोकांनी मनोभावे ऐकावी म्हणून त्याला "आयुरारोग्य व लक्ष्मी" यांचे "इंसेंटिव्ह(फलप्राप्ती)" दिलेले आहे.
"दिव्यांची कहाणी"
तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीताला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्या बाईकडून परत येणार नाही, अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावास्येसाठी सांगितली आहे.
दीप अमावस्याचे नाव 'गटारी अमावस्या' असे का पडले, याविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-
खरे तर तिथीनुसार या दिवसाचे अधिकृत नाव ‘आषाढी अमावस्या’ असे असले तरी "गटारी अमावस्या" हे नाव एवढे लोकांच्या वर्तणुकीला एवढे समर्पक आणि आकर्षक आहे की,खरे नाव लोकांच्या पार विस्मरणातच गेले आहे. गेले काही वर्षांपासुन गटारी अमावस्येला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबर सारखेच या दिवसाचे कार्यक्रम आखले जातात.खरे तर आषाढी अमावास्या “तमसो मा ज्योतिर्गमय ” असा संदेश देणारी, मंगलमय अशी मानली जाते.पण वास्तविकता काय आहे ?
भारतीय संस्कृती "गटारीचे महत्त्व" किती जाणते याचे हे उत्तम उदाहरण. गटार अशुद्ध पदार्थ वाहून नेते, गाव स्वच्छ ठेवते, रोगराई दूर सारते.पण शहरे वाढली, गटारे स्वच्छ होईनाशी झाली. गटारे स्वच्छ होण्यापेक्षा ती अशुद्ध होण्याचा वेग अधिक वाढला आणि गटारांमुळे रोगराई वाढू लागली.आषाढ महिना हा रोगराईचा महिना समजला जातो. जशी आज आपल्याकडे आता कोरोना, स्वाइन फ्लू, मलेरिया, सर्दि-पडसे आदी रोगांच्या महाभयंकर साथींचे प्रलय माजले आहे. त्या होऊ नयेत म्हणून पूर्वापार देवी-देवतांची आराधना होई; त्या प्रसन्न व्हाव्यात यासाठी विधी केल्या जात, बळी दिले जात. हा दिवस खरा तर या आषाढातील अस्वच्छता, रोगराई, साथीचे आजार म्हणजे एक प्रकारे घाण गटारात वाहून जाऊन त्यांचे उच्चाटन होते, म्हणून गटारी अमावस्या होय.असे मानले पाहिजे.
या दिवशी "दीपपूजा" केली जाते. कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे या दिवशी केले जातात. देशावर काही ठिकाणी बाजरीचेही दिवे केले जातात. दूधा-तुपा सोबत गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी जिवती पूजनही करतात.श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दीपपूजनाचा दिवस म्हणून पण ओळखली जाते. पूर्वीच्या काळी अंधारात आधार देणा-या मिणमिणत्या पणतीपासून ते लामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जात असे. आदल्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांना लख्ख करून ठेवलं जायचं. मग आजच्या दिवशी सगळ्या दिव्यांना पाटावर मांडून त्यासमोर रांगोळी काढून, गंध-फुलांनी त्यांची मनोभावे पूजा केली जात असे. गुळ-फुटाणे-लाह्या यांचा नैवेद्य दाखवून ‘दिव्याची कहाणी’ वाचून ह्या पूजेची सांगता होत असे. ह्या सगळ्या दिव्यांमधे मान असतो तो गुळ घालून केलेल्या कणकेच्या दिव्यांचा. हे दिवे वाफेवर बनवून नंतर पुजेत मांडले जातात.तसंच ह्या पुजेसाठी बाभळीची फुलं वापरली जात असत.
अशाप्रकारे, काळामिट्ट अंधार उजळून टाकणा-या ह्या चिमुकल्या सूर्यदूतांची पूजा करून त्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जात असे.म्हणून आषाढातली अमावस्या म्हणजे "दिपपुजा" ‘दिवली अमावस्या‘, ‘दिव्याची आवस‘ असे आपण म्हणतो.दीप म्हणजेच दिव्याला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे.
भारतीय सण संस्कृती यांचा निर्सगाच्या चक्राशी आणि परिणामी त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याचा एकमेकाशी नेहमीच काही संबंध असतो.
महाराष्ट्रात विशेषता ग्रामीण भागात मात्र ही अमावस्या "गटारी अमावस्या" या नावाने ओळखली जाते.
कारण या अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो.श्रावण महिन्यात अनेक जण "मांसाहार" करत नाहीत. एक महीना भर मांसाहार करायचा नाही,त्यामुळे बरीच माणसे आषाढी अमावस्येला मांसाहार करतात.या दिवशी दारू पिणे, मटन, चिकन, मासे खाणे असे प्रकार होतात.
शेवटी तुमचे शरीर,मन व आत्मा जे विनातक्रार स्विकारेल तेच तुमचे "अन्न" असते,हेच खरे !
Comments