जनकल्याण रक्तपेढी,महाड
- Aug 2, 2021
- 3 min read
"जनकल्याण रक्तपेढी,महाड"
महाराष्ट्र,कर्नाटक व तामिळनाडू या तीन राज्यात विखुरलेल्या सोळा जनकल्याण रक्तपेढ्या म्हणजे माझी सोळा अपत्येच आहेत.त्यातले "जनकल्याण रक्तपेढी, महाड" हे सर्वात लाडके अपत्य ! कोकणाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय ते स्वत:च्या पायावर उभे राहू न
शकणारे कायमचे "रांगणारे बाळ" आहे.आज ते "आपत्तीग्रस्त" असल्याने त्याच्या "प्रसव वेदनां" ची आठवण झाली.
महाड हे काही औद्योगिक किंवा व्यापारी शहर नाही.पण कोकणातील जिल्ह्यांकरिता मध्यवर्ती ठिकाण ! विविध वैद्यकीय शाखांचे उच्च पदवीधर तेथे पोहोचलेले.पण त्यांना "रक्तसेवा" उपलब्ध नाही.त्यामुळे हात सदानकदा बांधलेले. रक्तासाठी डोळे "मुंबई" ला लावून बसलेले.महाड-मुंबई दळण-वळण देखील कमी ! अशा वेळी विविध रोगांविरूध्द लढणार्या या मशीनगन्स( उच्च पदवीधर डाॅक्टर्स) ना बुलेटस् (रक्त) पुरविणारी रक्तपेढी उभारण्याची जबाबदारी "जनकल्याण रक्तपेढी,पुणे" या मातृसंस्थेवर आली.
सुरूवातीला कै.काकासाहेब चितळे स्मृती केंद्राने आपली वाचनालयाची जागा रक्तपेढीच्या उभारणीसाठी दिली.ती कमी पडू लागल्याने पुढे महाड नगरपालिकेने रक्तपेढीच्या उभारणीसाठी जमीन दान केली.इमारतीसाठी "निधी संकलन" करण्यासाठी आशाताई भोसलेंनी धर्मार्थ संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित केला.पोटासाठी मुंबईला गेलेल्या कोकणी चाकरमान्यांनी मोठ्या रकमेची देणगी तिकीटे फाडली व या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली.इमारत उभी राहिली.काही वर्ष संपूर्ण कोकणाला "जनकल्याण रक्तपेढी, महाड" ने "संपूर्ण रक्तसेवा" दिली.पुढे एडस् च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात "रक्तसेवा" सुधारण्याला प्राधान्य मिळत गेले.महाराष्ट्र शासनाचे तत्कालिन आरोग्यमंत्री मा.दौलतराव आहेर व केंद्र शासनाचे तत्कालिन आरोग्यमंत्री बॅ.मा.ए.आर.अंतुले यांच्या सहकार्यामुळे "जनकल्याण रक्तपेढी,महाड" साठी खूप मोठी वस्तूरूप मदत मिळवू शकलो.त्यामुळे रक्तपेढीने "आर्थिक तग" धरला.
१९९९ साला पासून देशात Blood Component Therapy चे वारे वाहू लागले होते.करोडो रूपयाचा खर्च असणारी ही सेवा "जनकल्याण रक्तपेढी,महाड" साठी उभी करावी या साठी सर्व स्थानिक सुह्रदांची महाड येथे सर्वव्यापी बैठक घेतली.सर्वानुमते "Blood Component
Laboratory" चे "शिवधनुष्य" पेलण्याचा निर्णय घेण्यात आला."निधी संकलना" साठी पुन्हा समाजामधे गेलो व दि.१४ मे,२०२१ रोजी "अक्षयतृतीया" या शुभमुहूर्तावर
महाड येथील जनकल्याण रक्तपेढीच्या "रक्तविघटन प्रकल्पाचे" उद्घाटन रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, महाडचे आमदार भरत गोगावले आणि महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि सुहास हिरेमठ यांच्या आभासी उपस्थितीत संपन्न झाले.
एका रक्त पिशवीतून "चार रुग्णां" ची वेगवेगळ्या रक्त घटकांची गरज त्या दिवसा पासून सुरू झाली.रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून, पन्नास लाख लोकांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास रक्तपेढीचे अध्यक्ष धनंजय परांजपे आणि संचालक संजीव मेहता यांनी त्यावेळी दिली होती.या रक्तविघटन प्रकल्पात, रक्तामधून फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, प्लेटलेटस्, क्रायोप्रेसिपेटेड आणि पॅक्ड रेड सेल्स हे घटक वेगळे करण्यात येणार आहेत. त्यामुळेे एका रक्त पिशवीतून चार रुग्णांची वेगवेगळया रक्त घटकांची गरज पूर्ण करता येईल.
या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखाने, काही संस्था आणि व्यक्तींचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे परांजपे यांनी सांगितले. सध्या जनकल्याण रक्तपेढी रक्त साठवण क्षमता अडीच हजार युनिटची आहे. ती चार ते साडेचार हजार युनिटपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.रक्तपेढीची "माणगाव" आणि "खेड" येथे रक्तसाठवण केंद्रे आहेत. या व्यतिरिक्त चिपळूण, दापोली आणि श्रीवर्धन येथे अशा प्रकारची रक्त साठवण केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहितीदेखील रक्तपेढीचे अध्यक्ष धनंजय परांजपे परांजपे यांनी दिली. साठवण क्षमता कमी असल्यामुळे सध्या संस्थेला वर्षाकाठी सहा ते सात लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. साठवण क्षमता वाढल्यानंतरच हा तोटा भरून निघेल. त्यावर नियोजनबद्ध काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
जनकल्याण रक्तपेढी आणि रक्तपेढीची पालक संस्था असलेल्या कै. काकासाहेब चितळे स्मृती केंद्राने कोरोना विरोधातील लढाईमध्येही आपले योगदान दिले आहे. गतवर्षी संस्थेने महाड शहरात व्यापक प्रमाणावर थर्मल स्कॅनिंगची मोहिम राबविली होती. आता लसीकरणाची गरज विचारात घेऊन संस्थेने लसीकरण केंद्राची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर महाड शहरातील ब्राह्मण सभा हॉलमध्ये हे केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे परांजपे यांनी सांगितले.
"दैव देते आणि कर्म नेते" अशी वेळ अतिवृष्टीने कोकण वासीयांवर आणलेली आहे.पण "हजारो हातां" चे बळ लाभलेला हा प्रकल्प या आपत्ती नंतर देखील "फिनिक्स" पक्षाप्रमाणे पुन्हा "गरूडझेप" घेईल व समस्त कोकण वासीयांच्या सेवेत दाखल होईल याबाबत माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही.
Comments