top of page

जन्म पत्रिका

  • dileepbw
  • Aug 21, 2021
  • 2 min read

"जन्म पत्रिका"


"जन्म पत्रिका" या विषयावर मा.ज्योतिबा फुले यांनी मांडलेल्या विचारांना आधुनिक शास्त्रीय विचारांची बैठक देण्याच्या प्रयत्नात गेली काही वर्षे स्वत:ला गुंतवून घेतले आहे.त्यासाठी माझ्या दीड लाख वाचक असलेल्या समाज बांधवांच्या अभ्यासगटात विवाह जुळवताना "जन्म पत्रिका" पहाण्यापेक्षा रक्तगट व थॅलेसेमिया स्क्रिनिंगचा अहवाल पहात चला असे प्रबोधन करीत आहे.हळूहळू का होईना पण अपेक्षित परिणाम दिसू लागले आहेत.


या संदर्भात मुंबई येथील माझ्या समाजाच्या वधू-वर परीचय मेळाव्यात माझे एक वाचक डॅाक्टर चेतन विसपुते यांनी मांडलेले "मेड फॉर इच अदर" हे खालील विचार लक्षणीय आहेत.


"कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं"


लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा संसाराचा डाव मांडायचा असतो.वेगळ्या वातावरणात,संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे? सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे.सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.


निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा ? त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं.अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.


कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा.या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना कळत जातं.


तेव्हा म्हणाली होती, 'वाचनाचा छंद आहे' पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडलं नाही बयेनं...

जाब विचारू शकतो आपण?


किंवा तो म्हणाला होता - 'प्रवासाची आवड आहे; जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं - असं स्वप्न आहे!'

पण

प्रत्यक्षात कळतं; कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं.

जेवायला वाढलंय.. हे ही चारदा सांगावं लागतं.

प्रवासाची आवड कसली?

- कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब... वर्षभर सांगतेय, माथेरानला जाऊ तर

उत्तर म्हणून फक्त जांभया देतो.

कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे. उरलेले न जुळलेले ४ कुठले ते कळले असते तर...


मनापासून सांगतो,

त्या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर लग्न होत असतं आपलं.


तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली... नाही जमलं की विस्कटली.


अन्याय शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला... पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी.


पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना सांगितलंच जात नाहीये;


नाही जुळलं -मोडा; व्हा विभक्त.


आणि मग करा काय??


आपल्याला 'हवी तशी' व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे.


धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार ?..

एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, ते मी स्वीकारणार आहे का?

या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी

देऊन मगच संसार मांडायला हवा.


आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं हे या वाटेवरच पाहिलं पाऊल...

ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की इतर सहा पावलं सहज पडत जातात..

आणि मग ती "सप्तपदी" - "तप्तपदी" होत नाही..


ती तृप्तपदी होण्यासाठी हा सर्व ऊपद्व्याप.

हेच संसाराचं खरं मर्म आहे.


आपल्याला ऊदंड वैवाहिक आनंदी आयुष्य लाभो हीच प्रार्थना


"मेड फॉर इच अदर" आपोआप होत नाहीत.होत जातात.

आपल्याला काय वाटते ?

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page