"माझे दलितायन - भाग २"
- Sep 14, 2022
- 2 min read
"माझे दलितायन - भाग २"
पाच पांडवातला अर्जुन जसा अज्ञातवासात असताना विराट राजाच्या घरी नाचगाणें शिकविण्यासाठीं तृतीय पुरुषी हिजडा "बृहन्नडा" म्हणून राहिला होता त्याच प्रमाणे आपल्या काॅलेजच्या पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटमधे मला सहा महिन्याकरिता "दलित" म्हणून रहावे लागले होते.
त्यामुळे "दलिताचे जीणे" काय असते याचा अल्प-स्वल्प अनुभव मला आहे.सांगतो.
आपल्या बॅचची पॅथाॅलाॅजीची एकुलती एक पोस्ट मंजिरी नूलकर(वाकनीस) ला मिळाली व माझ्या आवडीचा "पॅथाॅलाॅजी" हा विषय माझ्या हातातून निसटला.पुढचे चाॅइस नाईलाजाने होते अँनास्थेशिया व रेडिआलाॅजी ! तेव्हा मला अँनास्थेशिया हा "मदभरी आँखोसे पिला दे" थाटाची केवळ महिलांची शाखा वाटायची.तर रेडिआलाॅजी "हा खेळ सावल्यांचा" वाटायचा ! त्यामुळे रंगी-बेरंगी "पॅथाॅलाॅजी" कडे ओढा होता.
तेवढ्यात बायोकेमेस्ट्रीची व्याख्याता ही भरपूर पैसे मिळवून देणारी "गॅझेटेड पोस्ट" मला मिळाली व "रेसिडेंसी का मास्तरकी" अशा संभ्रमात मी पडलो. तशातच आपला "दलित" वर्गमित्र श्रीमंत अडसूळ पॅथाॅलाॅजीत व्याख्याता म्हणून रुजू झाला व मला तेथे येण्याचा आग्रह करू लागला.तेथे त्यांना कोणी "दलित" उमेदवार सापडत नव्हता.
माझा "पॅथाॅलाॅजी" कडील ओढा लक्षात घेऊन व पॅथाॅलाॅजीमधील लेवा पाटील समाजाच्या CR व SR यांनी हक्काची रेसिडेंसी सोडून "अळवावरचे पाणी" म्हणून "दलित" उमेदवार होण्यास नकार दिल्याने माझी वर्णी लागली व मी सहा महिन्यांकरता "दलित व्याख्याता" झालो.अशा तर्हेने माझा सहा महिन्यांकरता "बृहन्नडा" झाला.
या कालावधीतले माझे "टेंपररी दलित" म्हणून आलेले अनुभव ऐकण्यासारखे आहेत.पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटमधे माझे व अडसूळचे मनापासून स्वागत झालेले नव्हते.रेसिडेंसी न करताच आम्ही सरळ व्याख्याते झालो होतो याचा सर्वांनाच राग होता. माझ्यावर जरा जास्तच ! कारण मी तर "ओपन मेरिट" मधला उमेदवार असून देखील केवळ कर्मधर्म संयोगाने "व्याख्याता" झालो होतो ना ?
त्यामुळे आमच्यावर "सामाजिक बहिष्कार" होता. डबे खायला देखील कोणी येऊ देत नसे.कुठल्याही कामात सहभागी करून घेतले जात नसे.बोलत देखील नसत.रागाने पहात.कसेबसे आठवडाभर सहन केले व सरळ HOD ना भेटलो.त्यांनी कुठलेही काम "हलके" समजू नकोस व कशाचीही लाज व भीती बाळगू नकोस,असा मोलाचा सल्ला दिला.त्यामुळे दुसर्या दिवसापासून "व्याख्याता" आहे हे विसरून स्वत:ला "रेसिडेंट" आहे असे समजू लागलो.दहा ऐवजी आठलाच OPD जाऊन बसू लागलो.स्लाईड्स व ट्युब्ज धुण्यापासून सगळी कामे करू लागलो.संध्याकाळी पाचला घरी जाण्याऐवजी रात्री दहा पर्यंत डिपार्टमेंटलाच थांबून अभ्यास करू लागलो.त्यामुळे हळूहळू सर्वांना प्रिय होत गेलो.
पण एक ठराविक गट मात्र माझ्यावर "खार" खाऊन होताच.त्यांनी एकदा एक "कट" केला.मला आधी काहीच कल्पना न देताच त्यांनी संपूर्ण वर्गावर माझे व्याख्यान आयोजित केले.मला एक तास आधी सांगीतले.कटाचाच एक भाग म्हणून HOD पासून ते थेट JR पर्यंत सर्वजण या व्याख्यानाला उपस्थित होते.सुदैवाने व्याख्यान चांगले झाले व त्या दिवसापासून अख्खे डिपार्टमेंट माझ्यावर "फिदा" झाले व माझा "दलितवास" संपला.
Comments