"मैत्रीचा बगिचा - BJMC 1973"
"मैत्रीचा बगिचा"
काव्य,शास्र,विनोदाने फुलवलेल्या BJMC 1973 या "मैत्री" च्या बगिचात मधूनच राजकारण,धर्म, पंथ,जातीवाद,अस्पृश्यता या संवेदनशील विषयांचे "मदमस्त हत्ती" धुमाकूळ घालू लागतात तेव्हा हा बगिचा उद्धस्त होण्याची सार्थ भिती वाटू लागते. त्यासाठी वेगळा गट स्थापन करून दिलेला आहे ना ? वारंवार याचा अनुभव घेऊनही आपण शहाणे कसे होत नाही ?
"अस्पृश्यता" या संवेदनशील विषयावर कोणी मोकळेपणाने भाष्य करेल असे मला वाटले नव्हते.पण शांतारामने एक सुंदर स्वरचित कविता सादर रचून दलितांच्या दुखा:वर छान फुंकर घातली आहे.मी माझे अनुभव "दलितायन" या लेखमालेद्वारे या गटावर पूर्वी सांगीतलेलेच होते. अधिक अनुभव व त्यावर केलेली उपाय योजना तुम्हाला माझ्या drwani.net या ब्लाॅगवर वाचायला मिळतील.सर्चविंडोत फक्त अस्पृश्यता, वर्णव्यवस्था,जातीव्यवस्था असे मराठीत लिहा व माझे या विषयावरील गेल्या दहा वर्षातील लिखाण अवश्य वाचा.या विषयावर अन्य दलित वर्गमित्र गप्प का ?
शांतारामने मांडलेल्या "दैवी न्याय" या संकल्पनेला उदय "कोण देव ?" असे म्हणून नक्कीच "खो" घालणार."पैरवी" चा जयाने सांगीतलेला "पायाने" हा अर्थ अनुरूप नाही. त्याचा अर्थ "अनुसरण" असा आहे.काशीनाथने कुणाच्या विचारांचे "अनुसरण" करायचे हे त्याला सांगायची गरजच नाही.तो ते प्राणपणाने करतोच आहे.त्याचे मन:पूर्वक अभिनंदन ! पण बाकीचे "दलितमित्र" गप्प रहातात याचे आश्चर्य वाटते.
कासटने प्रामाणिकपणे आपल्या पूर्वजांच्या चुका मोठ्या मनाने मान्य केल्या आहेत.जगभर असेच चालते हे त्याचे समर्थन मात्र दीप्याने तत्क्षणी खोडून काढले आहे.त्यावर माझे मत असे आहे की हा "जीत व जेते" संबंध याचा परिपाक आहे.तो स्थलकालाबाधित नसतो.सर्वत्र सारखाच ! क्रूर लोकांच्या बाबतीत "सामूहिक हत्या" तर सहिष्णू
लोकांच्या बाबतीत "गुलामी" !
या चर्चेच्या निमित्ताने माणसाने "माणूस" मारून फक्त आणि फक्त "जात" जिवंत ठेवलेली आहे हे सांगणारी व सद्य संदर्भात बोध घेण्यासारखी एक वास्तवदर्शी कविता सादर करतो.
"जात"
मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"
मी "छत्रपतींवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"
मी "फुल्यांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"
मी "अहिल्या देवींवर" कविता लिहीली
लाेकांचा मला फोन आला अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का?"
मी "माणसावर" कविता लिहिली
मला फोनच आला नाही !
वाट पाहतोय "ती" माणसे गेली कुठे ?
मी आयुष्यभर "रक्तदान" हे जीवदानाचे राष्ट्रीय कार्य केले.पण त्याची दखल मात्र माझ्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाने कधीच घेतली नाही. आता आयुष्याच्या फुरसतींच्या क्षणी माझ्या समाजाचा ५०,००० वर्षांचा इतिहास लिहायला घेतला तर त्याचे वाचक मात्र महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या काना कोपर्यात ! असे आहे भारतीय "जातीव्यवस्थेचे महात्म्य" व त्याचे वास्तव ! जात नाही ती जात ! हेच खरे !
माझ्या मते अन्न,वस्र,निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येकालाच काही ना काही "कर्म" करावेच लागणार आहे.या कर्मानेच तर "जात" ठरते ना ? "कर्मा" ने होणार्या अर्थप्राप्तीमुळेच "वर्ग" निर्माण होतात ना ? ही "वर्गवारी" जाणे कधी तरी शक्य आहे का ? त्यामुळे "प्रजनन" या शेवटच्या मुलभूत गरजेचा विचार करताना "जात" डोके वर काढणारच ना ? विचार करा व खालील कविता वाचा."जाती" ची एक "नविन विचारधारा" सादर करतो.
जातीचं काय घेउन बसलात राव ? अरे जात म्हणजे काय
माहित तरी आहे का..?
अरे कपडे शिवणारा शिंपी,
तेल काढणारा तेली,
केस कापणारा न्हावी
लाकुड़ तोडणारा सुतार
दूध टाकणारा गवळी
गावोगावी भटकणारा बंजारा
वृक्ष लावणारा माळी
आणि लढाई लढणारा क्षत्रिय !
आलं का काही डोस्क्यात..?
आरं काम म्हणजे जात...
आता भांडत बसण्यापेक्षा
जाती बदला...
आता इंजीनीयर ही नवी जात...
कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात...
"सी.ए." ही पोटजात,
"एम.बी.ए." ही नवी जात...
बदला की राव...
कवाचं तेच धरुन बसलात...
घरीच दाढी करता नवं?
मग काय न्हावी का?
बुटाला पालीश करता नव्हं?
मग काय चांभार का?
गैलरी टेरेस वर झाडे लावता ना
मग माळी का?
दूध टाकणारा मुलगा गवळी का?
आरं बायकोच्या धाकानं का हुईना
संडास साफ करता नव्हं?
मग काय........?
आता अजून बोलाया लावू नका
आरं जात न्हाई ती जात.....न?
बरं जात नाही तर बदला की मग...
आरं कोण मोठा कोण छोटा?
ह्याला बी दोन हात त्याला बी दोनच नव्हं?
ह्यालाबी खायला लागतं
आणि त्याला काय फक्त....?
आरं कामानं मोठं व्हा,
जातीनं न्हाय...
आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला,
हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय?
मंग कशाला उगीचच?
सगळ्याला आता काम हाय...
सगळ्याला शिक्षाण हाय...
शिकायचं...
कामं करायची...
पोट भरायची...
की हे नसते उद्योग करायचे..!
"जन्माधिष्ठित" जाती मोडून नविन व्यवसायांवर आधारलेल्या नव्या "कर्माधिष्ठित" जाती निर्माण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे का ?
शांतारामने आपल्या कवितेत "बुंदसे गई जो अब हौदसे भी आती नही" असे म्हटले आहे खरे,पण ही
"बुंद" जगभर पुन्हापुन्हा सांडतच रहाणार आहे. कारण तोच तर मानवी स्वभाव आहे."लाख टके की बात" म्हणणारा उदय "माने या ना माने" !
Comments