माझ्या स्मरणातला ९ आँगस्ट क्रांतिदिन
- dileepbw
- Aug 10, 2021
- 2 min read
"माझ्या स्मरणातला "९ आँगस्ट क्रांतिदिन"
इ.स. १९९९ सालचा "९ आँगस्ट क्रांतिदिन" हा माझ्या चांगल्याच स्मरणात रहाण्यासारखा दिवस आहे.देशाच्या कानाकोपर्यातील रक्तपेढीतज्ञांचे अनुभव व मते लक्षात घेऊन संपूर्ण देशात "स्वयंस्फुर्त रक्तदाना" ची चळवळ रूजावी व रक्ताची "खरेदी-विक्री" थांबावी यासाठी आम्ही चाळीस तज्ञांनी मिळून रक्तपेढी विषयक नवा कायदा तयार केला व तो ५ आँगस्ट,१९९९ रोजी संपूर्ण देशात लागू झाला.देशात "रक्तक्रांती" आणण्यासाठी अनेकांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नाने साकार झालेल्या या कार्यात माझा देखील "खारीचा वाटा" आहे,याचे मनाला समाधान आहे.
"क्रांती" ची धगधगती मशाल हातात घेऊन देशात "स्वातंत्र्याचा प्रकाश" आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतीदिन म्हणून जो दिवस साजरा केला जातो त्याला ‘ऑगस्ट क्रांती दिन’ म्हणतात.हा दिवस पुणे विद्यापीठात एका महारक्तदान शिबिराचे आयोजन करून संपन्न करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे.पण १९९९ साली या महारक्तदान शिबिराला ५ आँगस्ट,१९९९ रोजी देशात लागू झालेल्या नव्या रक्तदान विषयक कायद्यांमुळे "ग्रहण" लागायची वेळ आली होती.या कायद्यामुळे पुण्यातील फक्त शासकीय व रेडक्राॅसची रक्तपेढीच सहभागी होऊ शकणार होती.अन्य रक्तपेढ्या सहभागी होऊ शकणार नव्हत्या.मोठाच पेचप्रसंग उभा राहिला.या नव्या कायद्याच्या निर्मितीत माझा मोठा सहभाग असल्याचे महाराष्ट्र शासन,अन्न व औषध प्रशासन तसेच महाराष्ट्रातील सर्वच रक्तपेढ्यांना माहित होते.सर्वजण "तारणहार" म्हणून माझ्याकडे आशेने पहात होते.
देशाच्या "रक्तक्रांती" च्या कायद्याचा मसुदा दिल्लीच्या DCGI च्या कार्यालयात तयार करण्यात आला होता.त्याला अंतिम स्वरूप देणार्या कायदा समितीचा मी अध्यक्ष होतो.
मीच मंजुरी दिलेल्या या कायद्याला शह देणारे "कायदा तोडो" आंदोलन करण्याची वेळ माझ्यावरच आली होती. रातोरात अभ्यास करून उडदामाजी "काळे-गोरे" निवडणारी "सूत्रे" महाराष्ट्र शासनाला बनवून दिली.मा.राज्यपालांची भेट घेऊन त्या "सूत्रां" ना मंजूरी प्राप्त करून घेतली व पुणे विद्यापीठातील महारक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.
ज्या धंदेवाईक रक्तपेढ्यांना रक्त खरेदी करणे व विकणे हे योग्य वाटते होते त्यांना ही मोठीच चपराक होती.स्वयंसेवी रक्तपेढ्या शासनाच्या निर्णयामागे ठामपणे उभ्या रहातात हे पाहून त्यांनी आपले धंदेवाईक रक्तपेढ्यांचे एक राष्ट्रीय संघटन रातोरात उभे केले व दीर्घ काळ शासनाशी कायदेशीर लढाई केली व शेवटी हार पत्करली.आपल्या कार्याला "नैतिक अधिष्ठाण" नसेल तर असेच होते.आज त्या संघटनेचे नाव ही कोणाला ऐकू येत नाही.




Comments