रंग पाण्याचे तसेच वाण्याचे
- Aug 10, 2021
- 2 min read
"रंग पाण्याचे तसेच वाण्याचे"
सुभाष सुराणाने पाठविलेल्या "रंग पाण्याचे" या कवितेत २६ वेळा "पाणी" हा शब्द आला आहे व वैशिष्ट्य असे की प्रत्येक वेळी "पाणी" या शब्दाचे विविध अर्थ उलगडत जातात.ही आहे मराठी भाषेची श्रीमंती !
'पाणी' शब्द हा असे प्रवाही,जसा वळवू तसा वाही !
जशी भावना मनात असते,रूप तसा बदलत वाही !
नयनामध्ये येता 'पाणी'
अश्रू तयाला म्हणती,
कधी सुखाचे, कधी दुःखाचे,
अशी तयांची महती..!
चटकदार तो पदार्थ दिसता,
तोंडाला या 'पाणी' सुटते,
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग 'पाणी' येते..!
धनाढ्याघरी लक्ष्मी देवी,
म्हणती अविरत भरते 'पाणी'..
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी जाते 'पाणी' ..!
"वळणाचे 'पाणी' वळणावरती"
म्हण मराठी एक असे,
"बारा गांवचे 'पाणी' प्यालाय"
चतुराई यातुनी दिसे..!
लाथ मारूनी 'पाणी' काढणे,
लक्षण हे तर कर्तृत्वाचे,
मेहनतीवर 'पाणी' पडणे
चीज न होणे कष्टाचे..!
उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो,
'पाण्या'त पाहणे गुण खोटा..
'पाणी'दार ते नेत्र सांगती,
विद्वत्तेचा गुण मोठा..!
शिवरायांनी कितीक वेळा,
शत्रूला त्या 'पाणी' पाजले..
नामोहरम करून, अपुले
मराठमोळे 'पाणी' दाविले..!
टपोर मोती दवबिंदूचे
चमचम 'पाणी' पानावरती,
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे,
अळवावरचे अलगद 'पाणी'..!
कळी कोवळी कुणी कुस्करी,
काळजाचे त्या 'पाणी' होते..
ओंजळीतूनी 'पाणी' सुटता,
कन्यादानाचे पुण्य लाभते..!
मायबाप हे आम्हां घडविती,
रक्ताचे ते 'पाणी' करूनी..
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती 'पाणि'
आभाळातून पडता 'पाणी'
तुडुंब, दुथडी नद्या वाहती,
दुष्काळाचे सावट पडतां
सारे 'पाणी पाणी' करती..!
अंतीम समयी मुखात 'पाणी'
वेळ जाणवे निघण्याची..
पितरांना मग 'पाणी' देऊनी,
स्मृती जागते आप्तांची..!
मनामनांतील भावनांचे,
'पाण्या' मध्ये मिसळा रंग..
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा,
चेहऱ्यावरती उठे तरंग..!!
या कवितेतील "पाणी" हा शब्द "वाणी(वाचा)" या शब्दाने बदलून शांताराम गोसावीच्या शीघ्रकवित्वाला आवाहन केले तर त्याने "वाचा" या शब्दा ऐवजी चक्क माझ्या नावा वरच खालील कविता तयार केली व मला थक्क करून सोडले.
रंग "वाण्या"चे
नयना मध्ये येता दु:खी जनांच्या पाणी
अश्रू पुसण्या वेगे धावूनी जाई हा वाणी
महापूर दाटे आभाळातून पडता पाणी
महाडकर सारे करती रक्ताचे पाणी पाणी
रक्ताचे घेऊन पाणी(प्लाझ्मा)धावे हा वाणी
चटकदार सर्व पदार्थ पाहता
तोंडाला याच्या सुटे सदैव पाणी
खाऊन खाऊन गोलमटोल झाला
असा आपुला "डब्बा "वाणी
पिऊन बारा गावचे नाना देशांचे
रंगीत रंगीत सुरा अन् पाणी
फिरून जगभर पेरून मधुर वाणी
मने जिंकून आलाय हा वाणी
लाथ मारून काढतो पाणी
बिकट संकटे असुनी हा वाणी
लक्षण हे स्वकर्तुत्वाचे असुनी
निसर्ग कोपे पडे मेहनतीवर पाणी
फिनिक्स पक्षासम उठे राखेतून
उमेद घेऊनी फिरे हा अनवाणी
गरूडा सम हा घेई भरारी
आमुचा "डब्बा" डी.बी.वाणी
घडविले "वाण्या" मायबापांनी
करूनीया रक्ताचे पाणी
विनम्र भावे तयांचे ठाई
सेवेसी तत्पर हा वाणी
ग्रुपचे पाहून आगळे वेगळे रंग
रंगांमध्ये मिसळे आपला वाणी रंग
सदैव झिजवूनी बुद्धी आणि वाणी
उत्कर्ष करण्या मित्रजनांचा झटे वाणी
अशी आगळी साधूवाण्याची कहाणी
नामोहरम करण्या थॅलेसिमियाला
दावोनि आपुले खान्देशी पाणी
सकलांच्या कल्याण्या झटे साधूवाणी
म्हणोनी "विद्या" याचे गृही भरे नित्य पाणी
या वाण्याची महान करणी वर्णिता
असा सखा वाणी आहे म्हणूनी
धन्य वाटे मनाला !
Comments