top of page

शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख - हिरोजी इटाळकर/इंदुलकर

  • dileepbw
  • Sep 15, 2022
  • 3 min read

"शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख - हिरोजी इटाळकर/इंदुलकर"

इ.स.१०९० साली Bolton Abbey चा सरदार Robert de Romille याने स्काॅटिश लोकांपासून संरक्षण करण्यासाठी बांधलेला "Skipton Castle,Skipton,UK" हा इंग्लंडमधला किल्ला पहायचा योगा मला आला होता.पाठीशी Eller Beck हा कडा घेऊन उभा असल्याने संरक्षणाच्या दृष्टीने हा एक मजबूत किल्ला समजला जातो.या किल्ल्याच्या भिंतींचे बंदुकीच्या व तोफांच्या गोळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी मेंढ्यांची कातडी वापरली गेली होती हे ऐकून मला फार आश्चर्य वाटले होते.सहा मजबूत बुरूज असलेल्या या किल्ल्याला अतिशय भव्य असे "नाॅर्मन" पध्दतीचे प्रवेशद्वार आहे.या किल्ल्याच्या बरोबर समोर स्कीप्टनचे सुप्रसिध्द "फ्ली मार्केट" भरते. माझी पत्नी व सुनबाई तेथे शाॅपिंग करण्यात व्यस्त असल्याने मला संपूर्ण किल्ला मनसोक्तपणे पहाता आला.त्यावेळी ब्रिटिशांच्या "हिशोबीपणा" चा एक अफलातून नमुना पाहून मला शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख श्री.हिरोजी इटाळकर/इंदुलकर यांची प्रकर्षाने आठवण झाली होती.ब्रिटिशांच्या "हिशोबीपणा" चा एक अफलातून नमुना मला तेथे पहायला मिळाला होता.बाह्य तटबंदीच्या भिंतीवरील प्रत्येक चिर्‍यावर मला तो कोरणार्‍याचे नाव कोरलेले आढळून आले. का ? तर नंतर मजुरीचा हिशोब करायला सोपे जावे म्हणून ! कुठे बायकोच्या अंगावरचे दागिने विकून व घर गहाण ठेऊन रायगड बांधणारे "हिरोजी इंदुलकर" आणि कुठे हे ब्रिटिशर्स !

सुभाषने आज सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ भारतीय "अभियंता दिन" साजरा केला जातो याची आठवण करून दिली.याच दिवशी मराठी साम्राज्याची राजधानी "किल्ले रायगड" बांधणार्‍या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख, वडार समाजाचे हिरो, श्री.हिरोजी इटाळकर/इंदुलकर यांचे पुन: स्मरण देखील केले जाते.कोण होते श्री.हिरोजी इटाळकर/इंदुलकर ? वाचा तर मग !

वडार समाजाचे हिरोजी इटाळकर नावाचे बांधकाम प्रमुख शिवाजी महाराजांकडे होते.रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर

सोपावली. एके दिवशी काही महिन्यांकरिता शिवाजी महाराज स्वारी वर गेले.हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला.परंतु मधेच शिवरायांनी दिलेला बांधकामासाठीचा पैसा संपला.हिरोजीला समजेना काय करावे.शिवाजी महाराजांनी तर आपल्यावर किल्ला बांधण्याची जबाबदारी टाकली आहे.किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.पैसा तर शिल्लक नाही.हिरोजीने अपूर्ण काम केले असे महाराज आपल्याला म्हणतील असे वाटून त्यांना खूप वाईट वाटले.त्यांनी आपला राहता वाडा, आपली जमीन विकली व काही पैसे जमवले.तो आपल्या कुटुंबासह रायगडावर आला.पैशासह झोपडी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली.छत्रपती शिवाजी महाराजांना आल्यावर कळल की आपल्यासाठी हिरोजीने काय काय केले.राज्याभिषेकाच्या वेळी त्याचा सत्कार करावा असे महाराजांना वाटले.ते

म्हणाले, "हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला, बोला तुम्हाला काय हवय." त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान झुकवून म्हणाला ," महाराज,उभं स्वराज्य तुम्ही पदरात टाकल,आम्हाला आणखी काय हवय ?"

महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे.त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे.रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे.त्या जगदिश्वराच्या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला द्या. महाराजाना कळेना हे कसलं मागणं ?

पगारवाढ नाही मागितली,देशमुखी नाही मागितली,पाटीलकी नाही मागितली,वतन नाही मागितल ...मागुन मागितले तर काय

दगडावर नाव कोरायची परवानगी ? महाराजानी विचारल हिरोंजी अस का ? आणि हिरोजी उत्तर देतात,"राजे !ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल, त्या- त्या वेळी जगदिश्वराच्या दर्शनाला तुम्ही याल... ज्या- ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या- त्या वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील ...आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरीवर माजे नाव कोरलेले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल."राजे,एवढं भाग्य फक्त पदरात टाका !

ही आहे वडार समाजाची अस्मिता ! मराठ्यांची राजधानी बांधणारे दुसरे तिसरे कोणी नसून वडार समाजातीलच छत्रपती शिवरायांचे शिलेदार हिरोजी इटाळकर आहेत.जय वडार !

आता या वडार समाजाच्या स्थापत्य अभियंत्यांची दूरदृष्टी आणि बुद्धिमत्ता आपण पाहूयात:

रायगड हा एक विलक्षण दुर्ग आहे.गडपती शिवाजीमहाराजांनी ज्या गडाला आपली राजधानी बनवून राज्याभिषेक केला,तो गड विलक्षण असणारच.चंद्रराव मोर्‍यांनी या गडाचा आसरा घेतला असतानाच शिवाजी महाराजांनी त्याला वेढा घातला होता.शिवाजी महाराजांनी स्वतः हा गड न्याहाळला.एका बखरीत लिहिले आहे. 'राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट,चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे,दीड गाव उंच, पर्जन्यकाळी कडीयावर गावात उगवत नाही आणि धोंडा तासीव एकाच आहे.दौलताबाद हि पृथ्वीवर चखोट गड खरा;पण तो उंचीने थोटका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलिले,तख्तास जागा हाच गड करावा.'

शिवप्रभूंचा स्थपती हिरोजी इटाळकर याने रायगडाचे बांधकाम केले.वापी-कूप-तडाग, प्रासाद,उद्याने,राजपथ,स्तंभ,गजशाला,नरेंद्रसदन, बारा महाल अशा अनेक इमारती हिरोजीनी रायगडावर उभ्या केल्या.रायगडाला तीन बाजूनी उभे,उत्ताल कडे आहेत.एका बाजूने वर येण्यासाठी वाट केली आहे.त्या वाटेवरही जागोजागी दगडात कोरून पायरया काढल्या आहेत.महादरवाजा हा बालेकिल्ल्याखाली सुमारे एक तृतीयांश अंतरावर आहे.शिवाजी महाराजांच्या बांधणीचे हे वैशिष्ट्य आहे.महादरवाजाखाली दीड-दोनशे फुट अवघड चढ आहे.शत्रू दरवाजापर्यंत येईपर्यंत दमावा,अशी योजना केली आहे.या बाजूला गडाला मोठी तटबंदी आहे,मूळ तटबंदीच्या बाहेर एक वेगळीच तटबंदी बांधून गड फार मजबूत केला आहे.ही तटबंदी पार 'टकमक' टोकापर्यंत पसरत गेली आहे. त्यात एक चोरदरवाजा आहे आणि एक महादरवाजा आहे.महादरवाजा बेचक्यात आहे.दोन प्रचंड बुरुज त्याचे रक्षण करतात.अशा बांधणीला जीभी म्हणतात.

या बांधणीबद्दल रायगडाला इसवी सन १६७३ साली भेट देणारा टोमास निक्ल्सने लिहिले आहे.

'वाटेत पायर्‍या खोदल्या आहेत.दरवाजाजवळ पायर्‍या पक्क्या खडकात खोदल्या आहेत.जेथे टेकडीस नैसर्गिक अभेद्यता नाही,तेथे २४ फुट उंचीचा तट बांधला आहे.चाळीस फुटांवर दुसरी तटबंदी बांधून किल्ला इतका अभेद्य बनवला आहे की,अन्नाचा पुरेसा पुरवठा असल्यास अल्प शिबंदीच्या सहाय्याने तो सर्व जगाविरुद्ध लढू शकेल.कड्याच्या टोकावर बांधलेली महादरवाजाची तटबंदी रायगडाला अभेद्य बनवते.शिवाजीराजांनी दुर्गबांधणीची कला आत्मसात केली होती.तटबंदीसाठी निवडलेली जागा अत्यंत उत्तम आहे.काही किलोमीटर्स लांबीची राजगडाची तटबंदी हे त्याचे,तर फक्त दीड-दोनशे मीटर्स लांब रायगडाची तटबंदी हे त्याचे वैशिष्टआहे. (संदर्भ: रायगडाची जीवनकथा - अवसालकर, सभासद बखर, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी)

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page