"शंकर-जयकिशन" मधील शंकरसिंह रघुवंशी यांची १०० वी जयंती"
- Dec 24, 2022
- 4 min read
"शंकर-जयकिशन" मधील शंकरसिंह रघुवंशी यांची १०० वी जयंती"
संगीतप्रेमी दीप्याने आज बॉलीवुडमधील सुप्रसिद्ध संगीतकारद्वय "शंकर-जयकिशन" म्हणजे शंकरसिंह रघुवंशी व जयकिशन दयाभाई पांचाल यातील "शंकरराव पैलवान" यांचा शंभरावा स्मृतीदिन असल्याचे सांगताच मला आपली सिनीयर भटेवरा हिने स्नेहसंमेलनात गायलेले "जियाॅं बेकरार हैं" या गाण्याचीच आठवण झाली. राजा वखारियाची ही अत्यंत आवडती जोडी ! माझा पनवेलचा मित्र डाॅ.विजय भगत याच्या नादाने मला राजकपूरचे चित्रपट पहायचा खूप नाद लागला होता.त्यामुळे संगीतकारद्वय "शंकर व जयकिशन" हे देखील आवडू लागले होते.त्यांचा एक किस्सा वाचल्याचे आठवते.रस्त्याने जाताना त्यांना एकदा वेश्यावस्तीतून चुकीचे तबलावादन ऐकू आले तर कसलीही लाज न बाळगता ते तडक वेश्यावस्तीत शिरले व थेट तबल्यावरच बसले.आहे का आवाज अशा संगीतप्रेमापुढे ?
१९७४ साली आलेल्या "रेशम की डोरी" या चित्रपटाचे चित्रीकरण पनवेलला पाहिलेले असल्याने तो आवर्जून पाहिला व "शंकर जयकिशन" पुन्हा एकदा अनुभवले.तर"बेईमान" या
चित्रपटाच्या माझ्या आठवणी फारच विदारक आहेत. माझ्या पनवेलच्या टेबल टेनिस व बॅडमिंटनच्या सर्व टीम्स उल्हासनगरला झालेल्या आंतरविद्यापीठीय सामन्यात पहिल्याच फेरीत पराभूत झाल्या होत्या.मी देखील त्या पराभूतांमधे होतोच.हे दु:ख पचवायला उल्हासनगरच्या "अमन" मधे "बेईमान" पाहिला व "शंकर-जयकिशन" यांचे संगीताशी असलेले "ईमान" पाहून दिल खुश झाले होते.असो.
"अंदाज" या चित्रपटाचे चित्रीकरण देखील पनवेलला पाहिलेले असल्याने तो देखील आवर्जून पाहिला व "शंकर जयकिशन" पुन्हा एकदा अनुभवले. कल आज और कल,लाल पत्थर,मैं सुंदर हूँ,भाई-भाई,मेरा नाम जोकर,प्रिन्स,तुमसे अच्छा कौन है,झुक गया आसमान,मेरे हुजूर,सपनों का सौदागर,शिकार,ॲन ईवनिंग इन पँरिस,आरजू, जानवर,एप्रिल फूल,संगम,दिल एक मन्दिर, आशिक,हरियाली और रास्ता,प्रोफेसर,जब प्यार किसीसे होता है,जंगली,दिल अपना और प्रीत पराई,जिस देश में गंगा बहती है,अनारी,उजाला,
यहूदी,श्री ४२०,बूट पॉलिश,आह,बरसात असे किती चित्रपट आठवायचे ? १७० आहेत एकूण !किती "फिल्मफेअर पुरस्कार" मिळाले याची पण गणती नाही.बहुधा नऊ !
बरसात" मधील 'अम्बुआ का पेड़ है,वही मुडेर है, मेरे बालमा,अब काहे की देर है' या गाण्याची चाल पृथ्वी थियेटर्सचे संगीतकार राम गांगुली यांनी दुसर्याच एका सिनेमातली वापरल्याचे राजकपूरला कळताच तो भडकला व त्याने हे काम शंकरकडे सोपवले.त्याने ही चाल वापरून 'जिया बेकरार है, छायी बहार है' या गाण्याला सुपरहिट संगीत दिले.राजकपूर शंकर जयकिशनचा "दीवाना" बनला व एकाहून एक अजरामर गाणी जन्माला आली.नमुन्या दाखल काही सांगतो.
आवारा हूं, आवारा हूं
प्यार हुआ इकरार हुआ है
सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी
मैं का करूं राम मुझे बुड्ढा मिल गया
सजन रे झूठ मत बोलो
अजीब दास्तां है.
जीना यहां मरना यहां.
जिया बेकरार है.
तेरी प्यारी-प्यारी सूरत को.
पर्दे में रहने दो.
बोल राधा बोल संगम होगा कि नहीं.
आजा सनम मधुर चांदनी में हम.
घर आया मेरा परदेशी.
मेरा जूता है जापानी
बहारों फूल बरसाओ.
जाने कहां गए वो दिन
'पैलवान' संगीतकार शंकर यांची संगीतकार श्री.श्रीधर फडके यांनी सांगीतलेली एक आठवण सांगतो.जयकिशन हा इतका गोराआणि सुरेख दिसायचा की सगळे त्याला गंमतीनं 'अमेरिकन लेडी' म्हणायचे. आणि शंकर यांना व्यायामाचं इतकं वेड होतं की त्यांना सगळे 'पैलवान' म्हणून ओळखायचे.लहानपणापासून शंकरच्या दोन 'पॅशन' होत्या.व्यायाम आणि संगीत! एक पॅशन 'शरीराला' निकोप ठेवणारी आणि दुसरी 'मनाला' समाधी अवस्थेप्रत नेणारी! यशस्वी जीवनाचा एक महामंत्र जणू शंकरला खूप लवकर गवसला होता.एखाद्या क्षेत्रातलं शिखर गाठायचं असेल तर शारीरिक तंदुरुस्तीचा पाया भक्कम हवा! "पृथ्वी थियेटर्स" मधे दरमहा ७५ रू.पगारावर काम करता करता शंकरराव "सितार" शिकले व अप्रतिम संगीतकार झाले."हारमोनियम" वाजवणारे जयकिशन त्यांना भेटले दादरच्या गुजराती फिल्मकार श्री.चंद्रवदन भट्ट यांच्याकडे.नेमका "पृथ्वी थियेटर्स" मधे हारमोनियमवादक हवा होता.
अशी जमली दोघांची जोडी.
१९४९ साली 'बरसात' आला तेव्हा शंकर २७ वर्षांचा होता.बाकीचे त्याच्याहूनही लहान. राजकपूर २५, मुकेश - शैलेंद्र २६, लता - जयकिशन फक्त २०.'बरसात' हे सिनेसंगीतातलं 'मन्वंतर' होतं.किती वेगवेगळ्या गोष्टी घडवल्या 'बरसात'च्या गाण्यांनी.नर्गिस,निम्मी,बिमला कुमारी या सर्वांसाठी एकच आवाज,तोही अगदी नवा 'लता मंगेशकर!' हा धाडसी प्रयोग त्यांनी प्रमाणाबाहेर यशस्वी करून दाखवला.बरसातच्या गाण्यात एकच राग सढळहस्ते वापरला 'भैरवी!' हा प्रयोगही सुपरहिट.पहिलं कॅबरे गीत पडद्यावर अवतरलं बरसात मधेच! पिक्चर रिलीज होण्याआधी 'गाणी' आणि 'रेकॉर्डस' बाजारात आणण्याची प्रथा बरसातनं सुरु केली. साऊंडट्रॅक साठी स्वतंत्र आणि 78 rpm साठी स्वतंत्र अशी (काही ) गाण्यांची दोनवेळा रेकॉर्डिंग केली. वादकांचा भला मोठा ताफा संगीतात अवतरला तो इथूनच! पहिल्याच सिनेमात एवढं 'लोकप्रिय तरी अभिजात' संगीत देण्याची किमया अन्य कुणाला साधली नाही.
शंकर हा 'यारोंका यार' होता.मैत्री लवकर करायचा आणि शेवटपर्यंत निभावायचा! मुंबईला आला तेव्हा मास्टर सत्यनारायण यांच्या नाटक कंपनीत होता.सत्यनारायणशी खास मैत्री झाली.पुढं 'रमैय्या वस्तावैय्या' या गाण्यात हा सत्यनारायण नृत्य करताना दिसला.नृत्यदिग्दर्शक ही तोच होता.
राजकपूर सोबत तर असं मेतकूट जमलं की बोलायची सोय नाही.अमिया चक्रवर्ती सोबतही खास दोस्ती.त्यांचे सहाही सिनेमे केले.सोहनलाल कनवरचीही तीच गोष्ट! 'दिग्दर्शक ह्रिषीकेश मुकर्जी' यांना तीन हिट सिनेमे दिले.अनाडी, असली नकली आणि आशिक!'
जयकिशनने दिलेल्या एका मुलाखतीमुळे दोघात वितुष्ट आलं नाहीतर लक्ष्मीकांत प्यारेलाल प्रमाणेच या दोघांची मैत्रीही बेमिसाल ठरली असती. जयकिशन सोबत मतभेद आणि मनभेद झाला तरी जय गेल्यावरही 'शंकर जयकिशन' या नावानंच संगीत देऊन शंकरनं यारी निभावली.असं म्हणतात की श्री ४२०, बसंत बहार,नया घर,आम्रपाली यातली ९०% गाणी शंकरने केली.'पॅथोस' असलेल्या गाण्यात शंकरचा हातखंडा होता. शिवाय 'डान्स नंबर' हा ही त्याचा प्रांत! स्वतः उत्तम नर्तक होता.इतका की पटराणी आणि आम्रपाली मध्ये साक्षात वैजयंतीमालाला त्यानं एकेक तुकडा शिकवला होता असं वाचनात आलं.
खरं तर शंकर जयकिशन हे 'लतावेडे' संगीतकार! 'बरसात' मधे अकरापैकी दहा गाणी लताची. 'पूनम' मध्ये नऊच्या नऊ लतागीतं! 'औरत' मध्ये सर्व नऊ सोलो गाणी लताची.'पटरानी' मध्ये सर्व दहा, काली घटाची सर्व सहा, मयुरपंखची सगळी सहा गाणी.. लताचीच! असा हा माणूस पुढे लतासारख्या गायिकेला सोडून 'शारदा' च्या आहारी जावा हे दुर्दैव!
आज शंकरची शंभरावी जयंती! ६५ वर्षं आयुष्य लाभलेला शंकर जेव्हा गेला तेव्हा शोकाकुल हसरत जयपू्रींनी लिहिलं होतं....
"जबसे सुना हैं मैंने की शंकर चला गया..
मुझे यकीं न आया की दिलबर चला गया..
डुबी हुई सोगमें अब मेरी जिंदगी
वो मौसिकी का समदंर चला गया...
एक एक करके तीनो मेरे यार चल दिये..
दिलदार चल दिये मेरे दिलदार चल दिये..
मैं तन्हा रह गया हूँ किसी पेड की तरह
कल जो मिले थे आज वो सरकार चल दिये....!
अद्वितीय संगीतकार शंकर यांच्या स्मृतीला नम्र अभिवादन !
Comments