"सदोष भारतीय शिक्षण पद्धत"
- dileepbw
- Oct 4, 2022
- 2 min read
"सदोष भारतीय शिक्षण पद्धत"
दिनकर म्हसदेने भारतीय शिक्षण पद्धतीचे दोष दाखवून सर्वांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. आपला देश शास्त्रज्ञ केव्हा निर्माण करेल ? असा त्याचा प्रश्न आहे.त्याचे उत्तर अगदी सोपे आहे व ते खालील श्लोकात सांगीतलेले आहे.वाचा.
"यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा
शास्त्रम् तस्य करोति किम् ?"
दिनकरने सांगीतल्या प्रमाणे भारतीय शिक्षण पद्धत ही मेकाॅलेने ब्रिटिशांचे हित जपण्यासाठी तयार केलेली होती हे त्रिवार सत्य आहे. भारतीयांची "स्वयंप्रज्ञा" व संस्कृती" हनन करणे हे ब्रिटिशांचे लक्ष्यच होते.कारण त्यांना आपल्याला "गुलामगिरी" तच ठेवायचे होते.असो.
एकेकाळी संपूर्ण जगाला सज्ञान करणारी "नालंदा" व "तक्षशिला" सारखी जागतिक ज्ञानपीठे असलेला आपला देश नंतर मागे का पडला ? याचा विचार करायलाच हवा. हे ज्ञान कसे नष्ट झाले ? कुणी व का नष्ट केले ? श्री.नारायण मूर्तीं यांनी उपस्थित केलेला "गेल्या साठ वर्षात आपण एक तरी असा शोध लावला आहे का की जेणेकरून जग बदलले आणि आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली ?" हा प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे.काय कारण असेल याचे? देशातील "घोका आणि ओका" हे सदोष शैक्षणिक वातावरण हेच त्याचे कारण आहे.आरतीने आपल्या अमेरिकेत शिकणार्या नातवाचे उदाहरण देऊन ते पुरेसे स्पष्ट केलेले आहे.
शिक्षणाचा अर्थ "माहितीचा संग्रह" करणे असा असता कामा नये,तर तो असलेल्या "माहितीचा सदुपयोग" करणे असा असला पाहिजे. आपल्या सर्वांनाच "रेडीमेड उत्तरा" ची सवय लागलेली आहे. जी शिक्षण पद्धती ही "रेडीमेड उत्तरां" वर अवलंबून असते ती नवं काही शोधत नाही,हे तर त्रिवार सत्य आहे ! त्या ऐवजी शिक्षणपद्धती ही प्रश्नांवर आधारित असायला हवी.विद्यार्थ्यांना दररोज नवनवीन प्रश्न पडले पाहिजे.प्रश्न निर्माण होण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये तसे वातावरण निर्माण करायला हवे.
त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये "शास्त्रीय दृष्टिकोन" निर्माण करावा लागतो.शास्त्र विषय शाळेत कॉलेजमध्ये शिकवणे वेगळे आणि "शास्त्रीय दृष्टिकोन" बाळगणे वेगळे.त्यासाठी शिक्षणात अर्थात वर्गात जिज्ञासा,कुतूहल याला भरपूर वाव हवा.तसेच शिक्षणामध्ये "अंधश्रद्धा" दूर करणारे विचार हवे, कारण अंधश्रद्धा हे केवळ "अज्ञान" नाही तर ती एक "सदोष प्रक्रिया" आहे.तिचा देव धर्माशी संबंध नसतो. अंधश्रद्धा म्हणजे "शब्दप्रामाण्य" ! अमुक अमुक सांगतो म्हणून ते खरंच असलं पाहिजे.त्याचे शब्द हेच प्रमाण.असे आपण घराघरातून,शाळेतून विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतो.इथूनच त्याची विचार करण्याची प्रक्रिया खुंटते आणि हळूहळू त्याला किंवा तिला प्रश्नच पडत नाही.
जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये "चिकित्सा" करण्याची प्रवृत्ती निर्माण होत नाही तो पर्यंत "शास्त्रीय दृष्टिकोन" निर्माण होत नाही. जर पुढील काही वर्षात भारतीय शास्त्रज्ञांची यादी १० वरून १०० वर न्यायची असेल तर आज शाळेतील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा दिली पाहिजे.शाळेमध्ये असे काही वातावरण निर्माण करावे लागेल की विद्यार्थी सातत्याने हात आणि मेंदू याचा वापर करतील. अर्थात "कृतिशील उपक्रम" मुलांना करायला मिळाला हवे. त्यातून त्यांना असंख्य प्रश्न पडतील त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा ते स्वतःच शोधतील.
आपण सर्वांनी मुलांच्या अवतीभवती जिज्ञासा, कुतूहल आणि प्रश्न निर्माण होतील असे इको सिस्टीम म्हणजेच वातावरण निर्माण करायला हवे. ही इको सिस्टीम घरातून शाळेत,शाळेतून कॉलेज, कॉलेज ते विद्यापीठ आणि विद्यापीठातून संपूर्ण समाजात निर्माण व्हायला हवी.तरच शिक्षणात "सृजनशीलते" ला वाव मिळेल.त्यासाठी लहान मुलांच्या प्रत्येक निरर्थक प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी.कारण आइन्स्टाइन यांनी म्हटले आहे की "The Important things is not to Stop Questioning"!
शांतारामने या सूचनांचे स्वागत केले आहे.तर आरतीने आपली अवस्था "झापड" लावलेल्या घोड्यासारखी आहे असे म्हटले आहे.हे "झापड" कुणी व का लावले हे सर्वांना समजेल तोच देशासाठी सुदिन ! आपली भाषा,आपली संस्कृती,आपले ग्रंथ व आपले ज्ञान या सर्वांचेच पुनरूज्जीवन व्हायला हवे आहे.




Comments