"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १८"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १८"
हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?
ही लेखमाला सुरू झाल्यापासून अनेकांना पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती आठवू लागल्या आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.संजय पाटीलला त्याचे डिझर्टेशन व परीक्षा ते थेट पुण्यातला पहिला "यंत्रमानव" पॅथाॅलाॅजिस्ट राजू राणे याच्याकडून शिकलेली "Boehring" या जर्मन कंपनीची आधुनिक स्वयंचलित यंत्रेच आठवली आहेत.ही सर्व पुण्यातील पहिली,जंगली महाराज रोडवरची,काॅर्पोरेट लॅबोरेटरी "मेडीनोव्हा" ची कृपा ! संजय पाटीलच्या या आठवणीने माझ्या गतस्मृतिंना उजाळा मिळाला.वाचा.
Hoechst या जर्मन औषध कंपनीची Diagnostics Division म्हणजे "Boehring Diagnostics" ! त्याचा भारतातला प्रमुख Dr.Hans Schick जनकल्याण रक्तपेढीच्या चांगलाच प्रेमात पडला होता."संख्यात्मकदृष्ट्या" पुण्यातील प्रथम स्थानावर असलेली जनकल्याण रक्तपेढी "गुणात्मकदृष्ट्या" देखील प्रथम स्थानावर असावी असे त्यांना मनापासून वाटे.कारण पुण्यात सर्वप्रथम HBsAg सुरू करण्याचे सौभाग्य जनकल्याण रक्तपेढीला मिळालेले होते. त्यासाठी Boehring Diagnostics कंपनीचे Reverse Passive Haemagglutination वर आधारलेले "Cellognost" हे तंत्रज्ञान वापरले जात असे.महाराष्ट्रात हे तंत्रज्ञान रुजविण्यात माझा "सिंहाचा वाटा" होता.त्यामुळे हे त्याचे प्रेम अगदी ओतू जात होते.
मी भारतात सर्व प्रथम "ELISA" हे तंत्रज्ञान आणावे यासाठी Dr.Hans Schick फारच उत्सुक होते.त्यासाठी Boehring ELISA Processor II हे Robotics वर आधारलेले स्वयंचलित तंत्रज्ञान मी खरेदी करावे यासाठी ते खूप मागे लागले होते.शेवटी मी जनकल्याण रक्तपेढीच्या खाली असलेल्या गोठ्यातील गाईंकडे बोट दाखवून माझी सुटका चरून घेत असे.मी गोठ्यात काम करणारा माणूस ! मला कुठले एवढे महागडे यंत्र परवडायला ?




Comments