"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 2 min read
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"
©दिलीप वाणी,पुणे
आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार ! आपले सर्वांचे "शिक्षक" प्रा.आर.व्ही.अगरवालसरांची आज प्रकर्षाने आठवण होत आहे.त्यांच्या मार्गावर चालणार्या माझ्या सर्व "शिक्षक पॅथाॅलाॅजिस्ट" ना आजच्या शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
"कुंभारासारिखा गुरु नाही रे जगांत,वर घालितो धपाटे,
आत आधाराला हात" अशी अगरवालसरांची एक आठवण सांगतो.दैवगतीने दोन CR ना "बायपास" करून पॅथाॅलाॅजी विभागात चंचूप्रवेश केलेला मी "Unwanted Baby" असतानाचा तो काळ होता.वाळीत टाकलेल्या अवस्थेत, म्युझियममधील जारमधे फाॅर्म्यालिनमधे मुरायला घातलेल्या अवयवासारखा मी म्युझियमसमोरील "तरूतळी" विमनस्क अवस्थेत उभा असतानाच Clinical PM चा तो "सुप्रसिध्द घंटानाद" झाला व समाधी अवस्थेतून भानावर आलो.
MBBS च्या दुसर्या वर्षात शिकत असताना केलेली सर्व पापे आठवली.Clinical PM ला न जाताच घेतलेल्याा शिक्षकांच्या "खोट्या सह्या" आठवल्या.ती पापे फेडायची वेळ आज आली होती.माझ्या नावाची "द्वाही" फिरवत ते Clinical PM माझ्या माथी मारण्यात आलेले होते.मी वाळीत टाकलेला असल्याने "आधी तुडवी तुडवी" या न्यायाने मुकाट्याने एकटाच डेड हाऊसच्या दिशेने मोहिमेवर निघालो.
डेड हाऊसला पोहोचलो तर खरा ! पण तेथे जाऊन करायचे काय ? हे सांगायला कोणीही बरोबर आलेले नव्हते."आधी तुडवी तुडवी,मग हातें कुरवाळी" अशा मनाच्या आशाळभूत संभ्रमावस्थेत असतानाच डेड हाऊसबाहेर अगरवालसरांची स्कूटर येऊन थांबली.मागे तोल सावरत ज्योती करंदीकर मॅडम बसलेल्या ! दोघांना तेथे पहाताच माझ्या जीवात जीव आला.
मग "ओल्या मातीच्या गोळ्याला,येते रूपाची नव्हाळी" असा शैक्षणिक कार्यक्रम सुरू झाला."मुगल-ए-आझम" या चित्रपटात जोधाबाई बनलेली दुर्गा खोटे जशी सलीम बनलेल्या दिलीपकुमारच्या अंगावर चिलखत चढविते तसा
करंदीकर मॅडमने स्वत:च्या हाताने मला गाऊन,कॅप,मास्क चढवला व भवानी मातेने शिवाजीमहाराजांना "भवानी तलवार" प्रदान करावी त्या थाटात माझ्या हातात "ब्रेन नाईफ" टेकवला. माझ्या सारख्या ओल्या मातीच्या गोळ्याला हळूहळू "योद्ध्या" च्या रूपाची नवी नव्हाळी प्राप्त झाली.
"शिष्य पावतो प्रतिष्ठा,गुरु राहतो अज्ञात" या उक्ती सार्थ ठरविणारे अगरवालसर आज हयात नाहीत.पण त्यांनी बनवलेले "घडे जाती थोराघरी,घट जाती राउळांत" ! तसा मी जनकल्याण रक्तपेढीच्या राऊळात जाऊन बसलो."कुणी पूजेचा कलश,कुणी गोरसाचा माठ" असे देखील अगरवालसरांचे अनेक "घट" आहेत.त्यांनी आजच्या "शिक्षकदिनी" त्यांचे मनोमन स्मरण करायला हवे."हात धरितां गुरूने ज्याची त्याला लाभे वाट" ! कोणी कुठल्याही वाटेला लागलेला असो,तरी पण गुरूला मात्र विसरू नका !
Comments