"शिष्यात इच्छेत पराजयम"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 1 min read
"शिष्यात इच्छेत पराजयम"
©दिलीप वाणी,पुणे
आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण सांगतो.ऐका.
शुभारंभाच्या काही महिन्यातच जनकल्याण रक्तपेढीमधे "एक हजार" रक्तदात्यांनी रक्तदान करताच मी रायचूरसरांना रक्तपेढीला आशिर्वाद देण्यासाठी निमंत्रित केली.त्यावेळी त्यांनी दिलेला "शिष्यात इच्छेत पराजयम" हा आशिर्वाद व त्याचा अर्थ माझ्या अजून लक्षात आहे.आपण दिलेल्या शास्त्रज्ञानात शिष्याने असे पारंगत व्हावे कि त्या शास्त्रज्ञानात त्याने आपलाच पराभव(शिकविण्यात यशस्वी ठरल्यामुळे) करावा अशी इच्छा बाळगणारा तो खरा गुरु ! खर्या गुरूसमोरचे ध्येय म्हणजे ’शिष्यात इच्छेत पराजयम’! हा आशिर्वाद ऐकून मी देखील मनातल्या मनात सुखावलो होतो.
कारण मी देखील चांगल्या योग्यतेचा शिष्य असल्याचे माझ्या कर्तुत्वाने सिध्द केले होते.सरांच्या या आशिर्वादातच मी "अर्थस्य मूढाः खरवद वहन्ति’ (खरा अर्थ जाणून घेतल्याशिवायच गाढवाप्रमाणे तथाकथित ज्ञानाचे निव्वळ ओझेच वाहणारे) नाही हा अर्थ दडलेला होता.
गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर सरांना "ॲनिमल पॅथाॅलाॅजी" ची तसेच Histo-techniques ची खूप आवड ! त्यामुळे त्यांनी माझ्या डिझर्टेशनचे शेकडो ब्लाॅक्स मला स्वहस्ते कापायला लावले होते.त्या मायक्रोटोमच्या नाईफला स्वहस्ते धार लावायला शिकवली होती.तो नाईफ हातात धरतानाही लटपटणारे माझे हात जेव्हा हुबेहूब सरांच्या सफाईने चालू लागला तेच सरांचे "प्रशस्तीपत्र" !
रायचूर सरांची Gross भोजनाची वेळ टळून गेली तरी लांबलेली असे.मग एखादी मुलगी खरी वा खोटी "चक्कर" येऊन पडली की मगच थांबत असे.महिन्यातून वीस पंचवीस वेळा Grossing झाले की मग त्यात "सफाई" येत असे.सरांसाठी तेच मोठे "बक्षीस" असे.
आदल्या दिवशी सर ज्याच्यावर प्रचंड रागावून जात असत तोच विद्यार्थी दुसऱ्या दिवशी सकाळी छानस हसून "Good Morning" म्हणे तोच सरांसाठी मोठा "पुरस्कार" असे. भविष्यात मोठा झाल्यावर तोच विद्यार्थी अचानक जवळ येऊन नतमस्तक होतो तेच सरांसाठी "राष्ट्रपतीपदक" असे व मी ते त्यांना मिळवून दिले याचा मला सार्थ अभिमान देखील आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना माझी भावपूर्ण आदरांजली !






Comments