"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १०"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १०"
हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?
काळाच्या ओघात जसजशी हिमोग्रॅमची तपासणी अधिकाधिक स्वयंचलित होत गेली तसतसे नवनवीन प्रश्न उभे राहू लागले.इतके दिवस एक तर मोघमात,नाहीतर अंदाजपंचे,नाहीतर फेकाफेकी केलेले रिझल्ट्स आता "डेसिमल" दिले जाऊ लागले."गणिती कोलांटउड्या" मारून क्लिनिशियन्सला आकृष्ट करायचे प्रयत्न सुरू झाले."तुझ्या गळा माझ्या गळा,गुंफू मोत्यांच्या माळा" या गीताप्रमाणे "तुला कळेना,मला कळेना,लक्ष्मी काही केल्या टिकेना" अशी परिस्थिती निर्माण झाली.कारण काही पैशात खर्च येणारा हिमोग्रॅम आता काही डझन रूपयांमधे जाऊन पोहोचला. लेशमन स्टेन रडत रडत गाऊ लागला - "जन पळभर म्हणतील हाय हाय,मी जाता करतील काय काय" !
मग रुमा मनचंदा मॅडमने मोठीच जनजागृती हाती घेतली. "लेशमन स्टेन" ला परत बोलावून घेतले."सेल काउंटर" ला "आंधळा" असे संबोधून तो फक्त अचूकपणे "नाणी" मोजतो पण त्यातले "खोटे सिक्के" मात्र ओळखत नाही.त्यासाठी "लेशमन स्टेन" च हवा ! मग मी "मोजायला" सेल काउंटर व "पहायला" मात्र मायक्रोस्कोप हे पथ्य आजतागायत पाळले व माझ्या क्लिनिशियन्सना व्याख्यानमाला आयोजित करून समजावून सांगतले.माझ्या या उपक्रमाचे गोखलेसरांनी तोंड भरून कौतुक देखील केले होते.
सेल काउंटरला फारसा "मेडीकल भेजा" नसला तरी तो "आर्यभट्ट" सारखा गणित करण्यात माणसापेक्षा खूपच जास्त हुशार आहे,हे नि:संशय ! त्याच्या या हुशारीचा आपण "अक्कलहुशारी" ने उपयोग करून घेतला पाहिजे.त्याची ही
अक्कलहुशारी "Thalassemia screening" करता कशी वापरायची ते हरीशने विस्ताराने सांगीतलेले आहे.जरूर अभ्यासा.पुण्याचे हिमॅटाॅलाॅजिस्ट डाॅ.विजय रामानन यांनी शोधलेला "रामानन इंडेक्स" पण अवश्य जाणून घ्या.




Comments