"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३२"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 2 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३२"
"ऑटोमेशन" चे "बत्तासे" संपले म्हणून प्रतापने आज "छंद" ही नवीन "दही हंडी" फोडली आहे.सांगतो त्याबद्दल आज !
आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या दिवशी रांगेत उभे असताना कमरेला रंगीबेरंगी अर्धवस्त्र गुंडाळलेला,उघडा बंब,डोक्यावरील जटांमधे मोरपिसे खोचलेली "वल्ली" कुणाकुणाला भेटलेली आहे ? मला नुसतीच भेटलेली नाही तर त्याने माझा जवळजवळ दहा वर्षे अव्याहतपणे पाठपुरावा केलेला आहे.डीन कार्यालयापासून ते सर्व विभागांच्या HOD कार्यालयांमधे या "वल्ली" ला "मुक्त प्रवेश" असे.अशी होती तरी कोण ही "वल्ली" ?
ही "वल्ली" हस्तसामुद्रिक व फेस रिडींग या शास्त्राची(?) अभ्यासक होती.समस्त महाराष्ट्रातून जमलेले नाना तर्हेचे "बुध्दिमंत व त्यांचे प्राक्तन" ताडून पहाणे हा त्याचा अभ्यास !त्याने वैद्यकीय महाविद्यालय निवडायचे कारण म्हणजे इथले सगळेच "बुध्दिमंत" व सगळ्यांचेच दीर्घकाळ अध्ययन ! मी जागतिक किर्तीचा "कारखानदार" होणार अशी याची "भविष्यवाणी" !
पांढरा डगला चढवून मी मायक्रोस्कोपमधे डोळा लावलेल्या अवस्थेत नंबर ५८(पॅथाॅलाॅजी OPD) च्या खिडकीत बसलेलो असताना हा समोरच्या बागेत उभा राहून माझ्या चेहेर्याकडे "एकटक" पहात तासनतास उभा असे.शेवटी एकदा न रहावून तो पॅथाॅलाॅजी OPD मधे आला व माझ्या "हाताचे ठसे" घेऊन गेला.दुसर्या दिवशी परत आला व मला अनामिकेत सोन्याच्या अंगठीत "पुष्कराज" घाला म्हणून विनवू लागला.विद्यावेतनात ते कसे परवडणार ? शेवटी "चांदी" वर "तडजोड" झाली व स्वखर्चाने अंगठी बोटावर चढली. त्यानंतर ही "वल्ली" कुठे व कधी भेटावी ?
यथावकाश मी MD झालो.काही काळ "मास्तरकी" देखील केली.दरवर्षी हा माझी लांबूनच "पहाणी" करून जायचा.हा "डाॅक्टर" कसा ? त्याच्या विद्येप्रमाणे मी तर एक "कारखानदार" असायला हवा होतो.
"विक्रम व वेताळ" मधल्या वेताळाप्रमाणे त्याने अखेरपर्यंत माझा "पिच्छा" सोडला नाही.माझा "पिच्छा" पुरवत पुरवत ही "वल्ली" थेट जनकल्याण रक्तपेढीत पोहोचली व माझ्या बोटात सासर्याने दिलेल्या "सोन्याच्या अंगठीत पुष्कराज" पाहून व भिंतीवर टांगलेला माझ्या नावाचा "रक्ताचे कारखानदार" हा "परवाना(Mfg.Lic.No.PD/03/1983)" पाहून गालातल्या गालात हसत निघून गेली.
या "वल्ली" च्या नादी लागून मी रेसिडेंसीमधे कोणता "छंद" जोपासला असावा ? काही अंदाज ?




Comments