"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३४"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३४"
"ऑटोमेशन" चे "बत्तासे" संपले म्हणून प्रतापने आज "छंद" ही नवीन "दही हंडी" फोडली आहे.सांगतो त्याबद्दल आज !
माझ्या पॅथॉलॉजी रेसिडेंसीच्या काळात इंग्रजी कादंबर्यांचा चांगलाच "सुळसुळाट" झाला होता.माझ्या इंटर्नशीपच्या काळात पुण्यातील सुप्रसिध्द संपादक श्री.बापू वाटवे यांचे चिरंजीव व पुण्यातील सुप्रसिध्द मनोविकारतज्ञ व लेखक डाॅ.संजय मुरलीधर वाटवे हे माझ्या बरोबर होते.गावा बाहेरील ओसाड मैदानावर व भकास वातावरणात असलेले हे "प्रा.आ.कें.सुपे" हेच माझे "वाचनालय" बनले होते.रफीच्या "हा छंद जीवाला लावी पिसे" या गाण्यासारखी माझी अवस्था झाली होती.दुधाच्या रतीबाप्रमाणे हा "ज्ञानगंगेचा रतीब" मी लावला होता.
डाॅ.संजय मुरलीधर वाटवे तीर्थरूपांच्या अफाट संग्रहातील
इंग्रजी कादंबर्या दर रविवारी "ट्रंक" भरून आणत असे. लाकडाला वाळवी लागली तसा मग मी या ट्रंकेला चिकटत असे.बालपणापासून सुहास शिरवळकर,एस.एम.काशीकर, बाबूराव अर्नाळकर यांच्या "रहस्यकथा" चा भोक्ता असलेला मी संजयमुळे सर ऑर्थर काॅनन डायल,आयन रॅंड,शेरलाॅक होम्स,हिचकाॅक,राॅबिन कुक,ऑर्थर हॅले यांचा "भोक्ता" झालो होतो.त्यांचे समग्र वाड्गमय इंटर्नशीपच्या सहा महिन्याच्या काळात वाचून झाले.
पॅथॉलॉजी रेसिडेंसीच्या काळात ऑर्थर हॅलेची "फायनल डायग्नोसिस" परत एकदा मन लावून वाचली.या वेळी अनुभव संपन्नतेमुळे ती अधिकची भावली.सर्व पात्रे परिचित वाटू लागली.आपल्याच परिसरात हे कथानक फिरते आहे असा भास होऊ लागला.मला स्वत:ला मी कादंबरीतला नव्या दमाचा पॅथॉलॉजीस्ट "डाॅ.कोलमन" तर आगरवालसर "जो पिअर्सन" असल्यासारखे भासू लागले.सर्जरीच्या मेहता मॅडममधे "लकी ग्रेनर" तर CCL चे तंत्रज्ञ पुरंदरे यांच्यात "बॅनिस्टर" ला शोधू लागलो.कुणाकुणाला आठवतात ही पात्रे ?




Comments