"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३५"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३५"
"ऑटोमेशन" चे "बत्तासे" संपले म्हणून प्रतापने आज "छंद" ही नवीन "दही हंडी" फोडली आहे.सांगतो त्याबद्दल आज !
व्यायाम(योगासने,रनिंग,जिम,वॉक,स्विमिंग,सायकलिंग),
कला(चित्रकला,वॉटर कलर,स्केच),शेतात भटकंती, कुंभारकाम,रेडिओ,घर,कार्ड पेपरची माॅडेल्स व विविध प्रकारचे ग्रीटिंग कार्ड्स,कुकिंग,इष्ट मित्रांचे वाढदिवस साजरे करणे,कविता करणे,सुचले तसे लिहीणे हे जसे प्रतापचे छंद आहेत,तसेच वाचन,मनन,चिंतन व लेखन हे माझे "निवृत्ती पश्चात" छंद आहेत.
छंद हा एक मस्त "विरंगुळा" असतो.म्हटले तर ते एक "ध्यान" असते.म्हटले तर ते एक मुक्त व्हायचे साधन असते.म्हणून प्रत्येकाने कुठला तरी "छंद" अंगी बाळगणे आवश्यक आहे.
देश-विदेशात रक्तपेढीविज्ञानावर "व्याख्याने झोडणे" हा माझा तरूणपणातला सर्वात मोठा छंद होता.त्यानिमित्ताने देशातील बहुतेक सर्व राज्ये व बरेच मोठे जग(संपूर्ण युरोप, संपूर्ण अमेरिका,संपूर्ण ऑस्ट्रेलिया,आफ्रिका,तसेच अंशत: पूर्व(सिंगापुर,मलेशिया,थायलंड) पालथे घालून झाले.
आता मित्रांनी पुरविलेल्या विषयावर रोज सकाळी चार तास वाचन,भोजन व वामकुक्षी करताना मनन व चिंतन व दुपारचा चहा झाला की चार तास लेखन हाच माझा "छंद" ! कुणाला वैद्यकीय किंवा रक्तपेढीविज्ञान विषयक सल्ला हवा असेल तो आनंदाने देतो.
मुले व पुतणे सर्वजण परदेशात स्थायिक झालेली असल्याने नातवंडे फक्त मोबाईलवरच भेटतात.सुदैवाने आधुनिक उपकरणे व त्याची प्रणाली पटापट आत्मसात करता येत असल्याने माझे "मज्जानू लाईफ" चालू आहे.एक सुभाषित ऐकवतो.ऐका.
कोऽतिभारः समर्थानां किं दूरं व्यवसायिनाम्।
को विदेशः सविद्यानां कः परः प्रियवादिनाम्॥
समर्थ व्यक्तींना अतिशय जड ओझं वाटावं असं कुठलं काम काय आहे? उद्योगी माणसाला दूर (अलभ्य) असे काय आहे? सुशिक्षित लोकांना परदेश (अनोळखी प्रदेश) असा कुठला असतो? मधुर भाषेत बोलणाऱ्यांना परका असा कोण असतो?
म्हणून आता चाललो इंग्लंडला दोन महिन्यांसाठी नातवंडांना खेळवायला ! आता BJMC 1973 बॅचच्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनालाच परत येणार !




Comments