"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ८"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 2 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ८"
हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?
मंगल म्हणते तसा पदव्युत्तर शिक्षणात "सेल्फ मोटीव्हेशन" चा भाग बराच असतो.म्हणून तर आपल्या प्रॅक्टिकल हाॅलमधेच सर रॅमनी कॅजाॅल यांचे एक वाक्य फ्रेम करून लावलेले आहे ! सांगू ?
No one was ever taught by others
Every one has to teach himself !
मेधा हेच सांगते आहे.या संदेशाला अनुसरून तिने KEM च्या इंटर्नशिपमधेच स्वयंप्रेरणेने बर्याच उपयुक्त गोष्टी शिकून घेतल्या.मंगल म्हणते विभाग चालवायची गरज म्हणून का होईना विद्यार्थी हे बहुसंख्येने उपलब्ध असलेले "मनुष्यबळ" वापरले जाते ही गोष्ट निःशंक ! पण ते करत असताना कळत न कळत पॅथॅालॅाजीचे व आयुष्याचे धडे मिळत जातात.हे ही खरे!
लोकांशी जुळवून घेणे,सिनीयर मित्रांकडून बेसिक तंत्र शिकणं व नंतर ती आपल्यापेक्षा छोट्या मित्रांना यथावकाश शिकवणं,रिपोर्टींग लिहीता लिहीता तपशील मांडायचं सुत्र नकळत शिकणं,इमर्जन्सीत एकटं काम करण्याने येणारा आत्मविश्वास व योग्य ते सोर्स वापरुन क्लिनीशयन्सनाही मदत करणं अशा गोष्टी आपोआप घडत जातात.शिकवाव्या नाही लागत ! काही उदाहरणे सांगतो.पहा पटतात का !
"ॲटाॅप्सीची ग्रॅास" हे आगरवालसरांचे क्लिनीकलचं ज्ञान देण्याचे व क्लिनीकल पॅथॅालॅाजी तसेच हिमॅटॅालॅाजी शिकवायचेच साधन असे.तर तीच "ॲटाॅप्सीची ग्रॅास"
रायचूरसरांसाठी व्यवहार शिकवण्याची व सगळ्या गोष्टींचा सगळ्या अंगानी विचार करायला शिकवायची संधी असे.
करंदीकर,जोशी,दांडेकर मॅडम यांच्याकडून कामातील शिस्त, निष्ठा तर गोखले,बापट,प्रधान सर यांच्याकडून "आऊट ॲाफ द बॅाक्स थिंकींग",सहजता,तत्परता शिकायला मिळत असे.
तसे एकमेकांकडून देखील बरेच काही शिकलो आपण !
मंगलने सांगीतलेले माझ्या कार्यकाळानंतरचे प्राध्यापकांचे "गुणविशेष" मला अनुभवायला मिळाले नाहीत हे माझे दुर्दैव ! पण "अभ्यासोनीच प्रकटावे" हा नागले मॅडमचा गुणधर्म मी एका Paediatric Tumor चे निदान करताना घेतलेला आहे.
कोल्हटकर मॅडमचा "मानवी ॲंगल" मी नुसता पाहिलेला नाही तर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या हातचा "बदामाचा शिरा" खाऊन पोटात रिचवला देखील आहे.
द्रविड सरांची "सकारात्मकता" मी १९८८ साली आपल्या मातृसंस्थेत रक्तपेढीविज्ञानाची परीषद आयोजित केली तेव्हा अनुभवलेली आहे.
देशमुख सरांच्या "पेपर पब्लीकेशनस्" मुळे भारावून जाऊन माझ्यासारखा व्यवसाय व समाजसेवा यातच रमलेल्या पॅथाॅलाॅजिस्टने देखील "संशोधनाची कास" सोडली नाही व चार संशोधनात्मक लेख मान्यताप्राप्त वैद्यकीय नियतकालिकांमधून प्रसृत केले.त्या संशोधनाचा पाया MD च्या जुजबी थिसीसनेच रचला होता.त्याच बळावर मी संपूर्ण देशासाठी "नॅशनल स्टॅंडर्डस् फाॅर ब्लड बॅंक्स्" तयार करू शकलो व शासनाने चक्क ते देशातील सर्व रक्तपेढ्यांसाठी बंधनकारक देखील केले.
माझ्या पदव्युत्तर शिक्षणातील विषयाचा आवाका व व्याप्ती मी "ॲकॅडेमिक्स व प्रॅक्टीस" या महत्वाच्या दोन बाबींमधे उतरवला.एवढेच नव्हे तर तो "रक्तसेवे" मधे देखील रूजवला.
गुरूजनांनी दिलेले प्राथमिक स्वरुपाचं ज्ञान पुढे अनुभवांनी व प्रयत्नांनी "वृद्धींगत" करीत नेले व भारतीय रक्तसेवेला एका उंचीवर नेऊन ठेवण्यात यशस्वी झालो.
मुलांना "केवळ प्रॅक्टीस" साठी तयार करणं हाच शिक्षणाचा "एकमेव उद्देश" ठेवता येणार नाही हे मंगलचे मत एकदम "सही" आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा व्हायलाच हवा.
वैद्यकीय महाविद्यालय केवळ तीन वर्षांमधे काय काय करणार ? त्याने आयुष्यभर "निरंतर शिक्षण" घेण्यासाठी विद्यार्थ्यांला तयार केले तरी पुरेसे आहे.मंगलने सांगीतल्या प्रमाणे आता नव्यानच एम.डी.करत असतानाच जिल्हा रुग्णालयामधे प्रशिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली आहे.तसेच बाॅंडची नोकरी व Senior Residency हे मार्ग देखील उपलब्ध आहेतच की !
प्रतापने Quality Control,NABL STD,Quality Control in Histopatholgogy,Hb electrophoresis
तर हरीशने मेडिकोलीगल माहिती,पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधले consent forms,disclaimers अशा अनेक प्रॅक्टिकल बाबींचा शिक्षणक्रमिमधे समावेश असावा असे सुचविले आहे. या गोष्टी शिकण्यासाठी मला "Indian Institute of Quality Management(IIQM),Jaipur येथे आठवडाभर मुक्काम ठोकावा लागला होता.अशा नवनव्या गोष्टी रोज येतच रहाणार आहेत.त्यामुळे त्याला सतत सिध्द रहाण्याचे प्रशिक्षण मातृसंस्थेने दिले तरी ते पुरेसे आहे.असे मला वाटते.त्यासाठी "सबजेक्ट सेमिनार" आहेतच की !
हरके सर म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे "Spoon feeding" शक्य नाही.शेवटी "पुस्तकी ज्ञान" वेगळे व "व्यावहारिक ज्ञान" वेगळे !




Comments