रामप्यारीबाई चौहान
- dileepbw
- Aug 22, 2021
- 3 min read
Updated: Sep 3, 2022
समरकंद म्हणजेच सध्याचा उझबेकिस्तान.तिथला क्रूर शासक तैमूर ! भारत जिंकून इथे धर्मप्रसार करावा या उद्देशाने तो भलंमोठं सैन्य घेऊन निघाला. अफगाणिस्तानातील गझनवी शासकांना त्याने हरवले. सर्वांना माहीतच आहे की,तो अत्यंत क्रूर,निर्दयी,दुष्ट होता.
तैमुरच्या अत्याचाराचे किस्से वाचून,कुणाचाही थरकाप उडेल.अफगाणिस्तानचा प्रदेश जिंकून,हाच तैमुर,हरिद्वार, हरियाणा,दिल्लीच्या रोखानें,पंजाब उध्वस्त करून निघाला. वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या राजांनी प्रतिकार केला देखील.पण तैमुरच्या विशाल सेनेपुढे कुणाचाही टिकाव लागू शकला नाही.राजे महाराजे थकले तरी, भारतीय जनता मात्र हार मानणारी नव्हती.
उत्तर भारतात त्याकाळी असणाऱ्या विविध जातींच्या प्रमुखांनी,देश धर्माच्या रक्षणासाठी एक समिती तयार केली.आमने सामने लढून आपला निभाव,तैमुर समोर लागणार नाही, ह्याची त्यांना पूर्ण कल्पना असल्यानें, त्यांनी गनिमी काव्याने लढायचे ठरवले.जोगराजसिंग परमार ह्यांना त्या सर्वानी आपल्या नवीन सैन्याचे प्रमुख बनवले.गावोगावचे तरुण लढण्यासाठी आले.पण आजपर्यंत कोणीही शस्त्र हाती धरलेले नसल्यानें,त्या सर्वांचे प्रशिक्षण जरुरीचे होते.तरीही त्यांचा आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास होता.जोगराजसिंग ह्यांनी त्या सर्व 'सेनेला' प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
इसवी १३०५ मध्ये,हरिद्वार जवळील कुंजासनहाटी गावात जन्मलेले जोगराजसिंग एक छोटे संस्थानिक होते. इस्लामी आक्रमकांनी त्यांचे संस्थान लुटून, जाळून नष्ट करून टाकले होते.त्यामुळे जोगराजसिंग गावोगावी फिरून, ह्या 'हिरव्या' संकटाशी लढायला युवकांना प्रेरित करत होते.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत,तब्बल ८०,००० युवकांची सेना, देशभरातून तयार झाली होती.सर्व जाती-जमातींची महापंचायत, पुन्हा एकदा विचार-विनीमयास बसली.त्यांच्यासमोर वेगळाच प्रश्न उभा झाला होता.गावो-गावच्या युवतीही लढायला तयार झाल्या होत्या.सर्वानी एक मताने ठराव मंजूर केला की,स्त्री सेना तयार करून,त्यांनाही लढण्याचे प्रशिक्षण द्यायचे. अशाप्रकारे,तब्बल ४५,००० युवतींची 'स्त्री सेना' तयार झाली.त्यांची सेनापती होती रामप्यारीबाई चौहान !
कोण होती ही रामप्यारी बाई चौहान ?
उत्तरप्रदेश मधील सहारनपूर गावात,रामप्यारीबाई चौहानचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासून इस्लामी आक्रमकांच्या भयकथा ऐकून, रामप्यारीचे मन पेटून उठत होते.अन्यायाचा प्रतिकार करायचा तर, शरीर मजबूत हवे.शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे.त्यासाठी रामप्यारी रोज सुर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर आपल्या शेतात जाऊन, सर्व प्रकारचे व्यायाम करत असे.व्यायाम करून आपले शरीर तिने दणकट बनवले होते.गांवकरी त्याबद्दल तिच्यावर टीका करीत पण तिचे आई-वडील मात्र तिच्या मागे ठामपणे उभे राहिले होते.एकदा पंचायती समोर तिने गावक-यांना ह्याचे महत्त्व पटवून सांगितले.इस्लामी आक्रमकांचा मुकाबला करायचा असेल तर,आपणच आपले शरीर मजबूत केले पाहिजे.तिने सांगितलेला हा उपाय सहजसाध्य होता,आणि सर्वाना पटला होता.मग काय ! गावोगावी अशी व्यायाम शिबीरे होऊ लागली.
सुरुवातीला फक्त आठ मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच ४५,००० रणरागिणींपर्यत पोहोचली.
हा काळ होता अंदाजे इसवीसन १३३० चा.एका पायाने लंगडा तैमुर,दिल्ली उध्वस्त करून पुढे सरकत होता.
पुढील ठिकाणी येताच त्याला नवल वाटले.लुटालूट करायला तो ज्या,ज्या गावात जाई,ते गाव अगोदरच रिकामे केलेले असे.सर्व धनधान्य बाड-बिस्तरा घेऊन गावकरी गायब झालेले असत.लुटायचे,मारायचे, बाटवायचे पण कुणाला ?गावकरी विहिरीतील पाण्यात देखील कचरा आणि घाण टाकून जात.ह्या गोष्टींमुळे,तैमुरच्या सैन्याची उपासमार होऊ लागली.गावकरी कुठे गेले हे शोधण्यासाठी सैन्य पुढे जाई.त्यावेळी गनिमी कावा करून,अचानक गावकरी सैन्यावर हल्ला करत आणि पळून जात.दिवसा आमने सामने लढाई करायला काहीवेळ पुरुष सैनिक पुढे येत आणि हल्ला करून पळून जात.रात्रीच्या वेळेत जाळपोळ आणि छुपे हल्ले ठरलेले.ह्या गनिमी हल्ल्यांनी तैमुर हैराण झाला.सैन्य देखील उपाशी राहू लागले तशी सगळ्यांची चिडचिड ही वाढू लागली.
रोजच्या रात्रीच्या गनिमी काव्याने सैन्य पुरते नामोहरम झाले.रामप्यारीच्या मर्दानी युवती रात्रीच्या वेळी छुपे हल्ले करत आणि हे हल्ले करत असताना त्या काळजी घेत असत,की तैमुरच्या सैन्याला झोप मिळणार नाही.हरदाई जाट,देवीकौर राजपूत,चंद्रो,ब्राम्हणी,रामदायी त्यागी ह्यांच्याकडे ह्या रात्रीच्या छुप्या हल्ल्याची जबाबदारी होती.
एखादी तुकडीच्या तुकडी वेगळी पाडून कापून काढणे. तंबूला आगी लावणे,आगींमुळे हत्ती पिसाळणे,सततचे जागरण ह्यामुळे,तैमुर चे सव्वा लाख सैन्य, अक्षरश: जेरीस आणले गेले.बरेच सैनिक तडफडून मरण पावले.मेरठ वर हल्ला केल्याचा तैमुरला आता पस्तावा होऊ लागला. नेमक्या ह्याचवेळी,लपून बसलेले जोगराजसिंगचे सैनिक, अचानकपणे चहुबाजूंनी चालून आले.त्यांनी सैनिकांच्या तुकड्या केलेल्या होत्या.त्यामुळे सतत नव्या दमाचे सैन्य लढायला तयार असे.
तीच कहाणी स्त्री सेनेची होती.रामप्यारीने दिवसा व रात्री लढण्यासाठी,आपल्या सेनेच्या तुकड्या केलेल्या होत्या. एक तुकडी झाडांवर बसून,तैमुरच्या सैन्यावर शर-वर्षाव करे तर दुसरी तुकडी,तैमूरच्या मेलेल्या सैनिकांची शस्त्रे व दारुगोळा घेऊन त्यांच्यावरच चालवत.पुरुष तुकडीचा म्होरक्या हरवीरसिंग गुलिया,लढाईच्या ऐन धुमाळीत, तैमुरच्या दिशेने निघाला.तैमुरच्या अंगरक्षकाना उडवून, बाहेरील कडे फोडून तो आत जातोय हे रामप्यारीने पाहिले मात्र,ती आपल्या तुकडीसहित,त्या धुमाळीत त्याच्या रक्षणार्थ उतरली,आणि सपासप सैनिक कापत,रामप्यारी बाईची स्त्री सेना, तैमुरच्या जवळ पोचली.
चपळाईने लढणाऱ्या स्त्री सैनिकांना पाहून,तैमुरचे सैनिक पुरते गोंधळले.हरवीरसिंगच्या रक्षणार्थ आलेल्या ह्या स्त्री सेनेचा धोका,खिजराखानने ओळखला.त्याने तैमुरचा घोडा खेचून,सटकण्याचा प्रयत्न केला.त्यात तो काहीसा यशस्वीही होत होता तोच, २२,००० सैनिकांची दुसरी आणि अंतिम तुकडी घेऊन, ताज्या दमाने जोगराजसिंग मैदानात उतरले.घमासान लढाई पेटली.तैमुर चक्क पळून जात होता.रामप्यारीने त्याला पाहिले व पळणाऱ्या तैमूरचा पाठलाग चालू केला.रामप्यारी घोड्यावर आणि तैमुर देखील घोड्यावर.तैमुर ने चिलखत घातले होते. चिलखतातून दिसणा-या तैमुरच्या काखेच्या उघड्या भागावर, रामप्यारी ने दौड घेतानाच, बाण चालवले. रामप्यारी ने त्याला गाठून त्याच्यावर तलवार देखील चालवली. पण विष लावलेले बाण शरीरांत शिरल्याने तैमुर बेशुद्ध होऊन घोड्यावरून पडला.खिजराखानला मागे येताना बघून रामप्यारी मात्र जंगलात नाहीशी झाली.
ह्या जबरदस्त प्रतिहल्ल्याने घाबरून,तैमुर भारतावरील आक्रमण व त्याचे मनसुबे गुंडाळून,समरकंदला पळून गेला.गळा,छाती तसेच बगलेतील जखमांमुळे, तैमुर लवकरच मेला.अशा या रामप्यारीला मानाचा मुजरा !!
Sources:
1.Saffron Swords by Manoshi Sinha Rawal
2.Anushree Priya Singh,B.A.(Eng hons) from Banaras Hindu University (2021)
फोटो शोध सौजन्य - गुगल
सूचना - सदर लिखाण डॉ. दिलीप वाणी © कॉपीराईट आहे.







Comments