"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४७"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४७"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सर्व मित्र-मैत्रिणींची समग्र माहिती देणारी "इ-डिरेक्टरी" प्रकाशित करण्याचा निर्णय अत्यंत योग्य झाला.कारण गेल्या पन्नास वर्षात प्रत्येकाच्याच आयुष्यात घडलेल्या महत्वाच्या घटना केवळ एक मिनिटात सांगणे केवळ अशक्य ! त्यापेक्षा ते लिखित स्वरूपात स्लाइडच्या माध्यमातुन पडद्यावर दाखवणे सोपे होते.शिवाय नंतर त्याची "इ-डिरेक्टरी" करणे हे देखील सहजशक्य !
बरीच चर्चा करून व कष्ट करून प्रत्येकाचा काॅलेज प्रवेशाच्या वेळचा व आत्ताचा फोटो,संपूर्ण कुटुंबाचा फोटो, अद्ययावत माहिती यांचे संकलन करण्यात आले.अगदी हयात नसलेल्या मित्र-मैत्रिणींची माहिती देखील त्यांच्या नातेवाईकांकडून संकलित करण्यात आलेली आहे.
एवढी तयारी करून शिवाय "एक मिनिटात परिचय" या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.माझा वाणी म्हणजे "W" हा नंबर शेवटी आल्याने व गृप फोटोची घाई असल्याने तीन वाक्यात व अर्ध्याच मिनिटात माझा परिचय करून दिला.काय सांगीतले परिचय देताना ? वाचा,
माझे गेल्या चाळीस वर्षातले कार्य म्हणजे सेवा,व्यवसाय व धंदा यांचा "त्रिवेणी" संगम ! भारतवर्षात जनकल्याण रक्तपेढ्यांची शृंखला उभारणे ही माझी "सेवा",भारती विद्यापीठ तसेच अन्य शैशणिक संस्थांमधून विद्यादान हा माझा "व्यवसाय" तर मेडीकेअर पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीजची शृंखला हा माझा "धंदा" ! संपूर्ण आयुष्य अशी "कसरत" केल्यामुळे मुले-बाळे सातासमुद्रापार उडून गेली ही त्याची मी मोजलेली किंमत !






Comments