"गेले ते दिन गेले - भाग १"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 3 min read
Updated: Dec 4, 2023
UG च्या असंख्य आठवणी आज पर्यंत तुम्हाला सांगीतल्या. त्यासाठी लिहावे लागलेले "लांबलचक लेख" सर्वांनी आवडीने वाचले. त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! आपले "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन" जवळ येऊन ठेपल्यामुळे काॅलेजच्या काही आठवणींना पुन्हा उजाळा देऊ या. या हृद्य आठवणींना कृपया धार्मिक व राजकीय वळण देऊ नये व त्याची "लांबलचक" अशी हेटाळणी करू नये ही नम्र विनंती.
MBBS चे दुसरे वर्ष हे "मौजमस्ती"चे वर्ष! ना रिझल्टचे टेंशन ना परीक्षेचे! त्यामुळे मी व राजा वखारिया रोज संध्याकाळी कॅम्पमध्ये फिरायला जायचो. तो होस्टेलच्या आयुष्याचा अतिशय मनोरंजक अन अपरिहार्य असा भाग होता. एक पैसाही खर्च न करता मन रमवायच सहज साधन म्हणजे "कँपचा फेरफटका"! कसा असायचा हा फेरफटका? वाचा.
लेडीज होस्टेल समोरील दारातून कपडे ठीकठाक आहेत ना, असा अंदाज घेत, अन केसावर हात फिरवत अनेक "कंपू" आमच्या बरोबर भटकायला बाहेर निघायचे. समोरची नाजुकशी हालचाल, अन चिवचिवाट कावळ्यासारख्या माना फिरवत आपली आवडीची कोणी कुठे दिसतेय का अस गपचूप बघत, कोण कोणाशी कसं बोलत आहे लेडीज होस्टेलच्या दारात, हे मात्र नीट बघूनच लोक पुढे सरकत असत! आम्ही पण त्याला अपवाद नव्हतो. बंड्या काशीकर तेथे कायमच घोटाळत असायचा. असो.
एकमेकांची चेष्टा-टवाळी अन चिडवण करत करत कमिशनर ऑफिसवरून गेल्यावर आमची "चौपाटी" येत असे. केवळ वाळूवरती दुकान थाटल म्हणून त्याला "चौपाटी" असं नाव पडल असावं! तेथे समुद्र वगैरे काही ही नाही. पुणे हा पर्जन्यछायेचा प्रदेश! चहूबाजूंनी डोंगरांनी घेरलेले "आमुचे पुणे" हे बशीच्या खोलगट भागाप्रमाणे "मुळा-मुठे" च्या खोर्यात वसलेले शहर! तेथे कुठला आलाय समुद्र! पण "आम्ही पुणेकर" वस्ताद! रस्त्यावर वाळू टाकून "खेळ मांडीयेला वाळवंटी काठी,नाचती वैष्णव भाई हो" असे म्हणत संधी मिळताच "पेशवाई" मधे रमणारे लोक! पाव भाजी, जूस अस चटपटीत खायला पुरवणारे ते बहारदार अड्डे होते. मिक्स फ्रुट जूस घेऊन रस्त्याकडे तोंड करून बसलं की डोळ्याच पारण बसल्याजागेवरच फिटत असे. विविध कपडे घालून अन नटूनथटून चाललेल्या "सुंदर अन अप्राप्य" मुली बघणे अन उगाचच हळहळणे यात खूप मजा येत असे. लक्ष्मीरोडवरचे "अंबाडा किंवा खोपा" घातलेले सदाशिवपेठी सौंदर्य व ए.जी.रोडवरचे वार्यावर केस उडवणारे "बाॅबकटी व शोल्डरकटी" युरोपियन सौंदर्य, यात जमीन अस्मानाचा फरक असे. एखाद्याने पार्टी दिली अन चौपाटीवर बसलं तरच! नाहीतर तेथून वळून एम्पायरच्या रस्त्याला लागून चांगल मिनिटभर उभ राहून "जवानी की कहानी", "रातोकी बहार" अथवा एखाद्या आंग्ल चित्रपटाच एखादे प्रक्षोभक पोस्टर न्याहाळून मगच मंडळी पुढे सरकणार! फारच मन चाळवले तर मग "उत्तान सौदर्य" न्याहाळायला "वेस्टएंडचा कट्टा" असायचाच. मग "उसासे" टाकतच कोपऱ्यावरच मिळणारा "उसाचा रस" लिंबू टाकून प्यायचा व "भडकती जवानीकी आग" शांत करीत अस्सल कँपची पुढची वाट धरायची!
मग येणारी नाझ बेकरी, अन सुरु होणारा कँप! एकदम बदलेल्या त्या वातावरणाला काय म्हणाव? मिनी युरोप ? ठिकठिकाणी शर्ट, जीन्स, टोप्या, पट्टे, मुलींचे ड्रेसेस यांची दुकानं रस्त्यावर थाटलेले लोक! शेगदाणे, खारे दाणे, काबुली दाणे विकणाऱ्या गाड्या, परफ्युमस्, बिंद्या, लिपस्टिक, केसांचे आकडे विकणारे लोक! सगळाच "मायाबाजार"! ३०० रु. सांगितलेला शर्ट १०० रु. त मागणे व त्याने एवढे कमी थोडेच होतात राव? असे म्हटल्यावर चालायला लागणे अन हाक मारून परत बोलावून त्याने तो १०० रु.ला देऊन टाकणे यातला आनंद अन मजा अनुभवल्याशिवाय कळणार नाही!
मुलींनी सुंदर म्हंजे किती सुंदर असावं? मेकअप किती छान असावा? अन किती भीषणही असू नये? कपडे किती तोकडे असू शकतात अन गोऱ्यापान कांतीवरील निळ्या डोळ्यात काळ काजळ कस जादू करत? अस किती अन काय काय "कँप" मध्येच पाहायला मिळायचं! मधेच "कबाबमें हड्डी" असावी तसे मरीन ब्लू कोट घातलेले अन डोक्याचा चमन केलेले NDA चे "हडेलहप्पी कॅडेट्स" कसे फिरायचे अन कसे पिसाटासारखे वेळप्रसंगी मारामारीही करायचे हे पहाण्यासारखे असायचे!
"मार्जोरीन"चा रोझ मिल्क शेक अन कडक काठ कापलेले हिरवी चटणीवाले, मऊशार अलवार सँडवीचेस्,पॅस्ट्री, बुधानीचे सुरेख वेफर्स, जॉर्जची रोस्टेड चिकन अन दोराबजीच तळलेल अंड वरून पेरलेल चिकन, आहार मधला व्हेज फ्राईड राइस, जाॅर्ज बाहेरच्या टपरीवर मिळणारी "चा-चा-चा" व "राॅक ॲंड रोल" नावाचे सुंदर विडे! या सगळ्याबरोबर प्रचंड टोपलीसारखे केस असलेला अन तसाच प्रचंड कुत्रा वागवणारा बूट पोलिशवाला, पाय नसलेला बुटका भिकारी, "ग्रीटवेल" हे पराडकर यांचे दुकान, तिथली सुंदर ग्राटींग्ज, भेटवस्तू, अप्रतिम लेटरपॅड अन पेनं, फुगे विकणारे लोक, छोटी-छोटी खेळणी, रंगीबेरंगीत साईन बोर्डस्, बूट अन ब्रँडेड शर्टांच्या शोरूम्स अन त्यांचे "discounted sales"! काय काय आठवावं अन काय काय विसराव?
रात्रभर बाॅलीवूडवर वितंडवाद घालून पहाट उजाडू लागल्यावर साडेपाच वाजता मी व राजा नाझमध्ये शिरा - जो फक्त तेव्हाच मिळतो, तो खाऊन अन त्याबरोबर आता काहीतरी तिखट द्या म्हटल्यावर त्या सहृदयी माणसाने दिलेली "तिखट साॅस" ची बाटलीच चमचा चमचा घेत संपवली होती अन तोही बापडा आनंदाने हसला होता.
असे प्रेमाचे आनंदाचे आकर्षणाचे क्षण देणारा कँप आजही सर्वांच्या मनात जसाचा तसाच आहे!
(शब्दसौजन्य -डाॅ.हरीश सरोदे,बी.जे.ची १९८६ तुकडी)






Comments