top of page

"गेले ते दिन गेले - भाग ८"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 2 min read

"गेले ते दिन गेले - भाग ८"

UG च्या असंख्य आठवणी आज पर्यंत तुम्हाला सांगीतल्या. त्यासाठी लिहावे लागलेले "लांबलचक लेख" सर्वांनी आवडीने वाचले.त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद !

आपले "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन" जवळ येऊन ठेपल्यामुळे काॅलेजच्या काही आठवणींना पुन्हा उजाळा देऊ या.या हृद्य आठवणींना कृपया धार्मिक व राजकीय वळण देऊ नये व त्याची "लांबलचक" अशी हेटाळणी करू नये ही नम्र विनंती.

१९७३ साली आपण MBBS च्या पहिल्या वर्षाला असताना "पावशेर मिशा" राखणारे राजा निफाडकरसर आपल्याला CVS शिकवताना ECG वाचायला पण शिकवायचे. आठवते ? त्यावेळी HOD रानडेसर त्यांना रागवायचे की पोरांना समजेल असे शिकवा.तुम्ही MD Medicine साठी प्रवेश घेतला असला तरी ही पोरे "बाळबोध"च आहेत.त्यामुळे खूप वेळा राजा निफाडकरसर शिकवत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवायला पडद्याआड HOD रानडेसर येऊन बसायचे.मग माझी "डबलएजंट ड्युटी" सुरू व्हायची.

HOD रानडेसरांवर लक्ष ठेवण्यासाठी "डबलक्राॅस" करून राजा निफाडकरसरांनी "बॅकबेंचर" म्हणून माझी "डबलएजंट" अशी नियुक्ती केली होती.आठवतो का तो फिजिऑलाॅजीचा "चढत्या भाजणी" चा "डेमो हाॅल" व त्याच्या सभोवतालची पोकळी ? त्या पोकळीत लपून बसलेल्या HOD रानडेसरांवर मी वरच्या "मचाणा" त बसून लक्ष ठेवायचो व मागून राजा निफाडकरसरांना "खाणाखूणा" करून "गनिमाची खबरबात" कळवायचो.

या "हेरगिरी" च्या बदल्यात राजा निफाडकरांनी मला एकट्यालाच ECG कसा वाचायचा हे शिकवले होते. सुभद्रेच्या पोटातील अभिमन्यूसारखाच मी पहिल्या वर्षातच दुसर्‍या वर्षाचे ज्ञान प्राप्त करून घेतले होते.असो.आता दुसर्‍या वर्षातील कृष्णराव निफाडकरसर(KBN) उर्फ नानांची आठवण सांगतो.ऐका लक्ष्यपूर्वक !

१९७५ साली आपण MBBS च्या द्वितीय वर्षाला असताना एकदा काय झाले की Immunology शिकवायला Practical काय ठेवावे असा प्रश्न उभा ठाकला.कृष्णराव निफाडकरसरांनी एक "शक्कल" काढली.T cell,B cell, Type I to Type IV reactions त्यांनी एका फुलस्केप कागदावर लिहून काढल्या व त्या नोटिस बोर्डवर लावल्या.ते सर्वांनी जर्नलमधे उतरवून काढायचे व प्रॅक्टिकल हाॅलमधे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची असा "प्रश्नमंजुषा" चा कार्यक्रम होता.हे वर्गात सांगीतले तेव्हा माझे लक्ष भलतीकडेच होते.देवाने दिलेला "लांब शेपटा" कापून कोणीतरी "भुंडी" होऊन त्याच दिवशी वर्गात आलेली होती व मी त्या दुखा:त पार बुडून गेलो होतो.असो.

नेहेमीप्रमाणे जर्नल उघडून त्यात तोंड खुपसून मी काही तरी वाचत असल्याचे नाटक करीत होतो.तेवढ्यात कृष्णराव निफाडकरसर हळूच मागे येऊन उभे राहिले.मी अजून जोरात जर्नल वाचायचे नाटक सुरू केले.सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला व मिश्किलपणे विचारले - "बाळ ! कसले Practical आहे आज ?"

माझी बोबडीच वळली.मग सरांनीच ते सांगीतले व हळूच विचारले याला काय म्हणतात माहित आहे ना ? "A barber without a razor" !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page