"गेले ते दिन गेले - भाग १०"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 2 min read
Updated: Sep 3, 2023
"गेले ते दिन गेले - भाग १०"
UG च्या असंख्य आठवणी आज पर्यंत तुम्हाला सांगीतल्या. त्यासाठी लिहावे लागलेले "लांबलचक लेख" सर्वांनी आवडीने वाचले.त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद !
आज ज्या मित्रांना आपल्याच मातृसंस्थेत कटु अनुभव
अनुभवाला आले त्यांच्यावतीने "हे शल्य मनीचे सांगू कुणा ?" असा लेख लिहीतो आहे.पूर्वी देखील आपल्या गटात असे कटु अनुभव सांगण्यात आलेले आहेत.पण त्यातून काही "विधायक" घडण्याऐवजी गटावर अधिकच "कटुता" निर्माण झाली.त्यामुळे या लेखावर सर्वांनी सावध प्रतिक्रिया द्यावी.ही नम्र विनंती.
सर्जरीचे रजिस्टार ठिपसे यांनी रोहिदास व्यवहारेला पायात चकाकणारे बूट न घालता चप्पल घालून का आलास म्हणून झापडल्याचे मला आजसुध्दा आठवते.ॲनाटाॅमीच्या काही खाष्ट डेमाॅंस्ट्रेटर महिला तुम्ही होस्टेलला राहणारी मुल एक जात नालायक असता,आई-बापाचा पैसा उडवता,घरी चांगली शेतीवाडी असेल म्हणून अभ्यासात बोंब अशी "मुक्ताफळे" उधळत असत.अन पायात घाणेरडे स्लीपर घातलेल्या,दोन दिवस दाढी न केलेल्या,एप्रनची बटणे तुटलेल्या अन वाक्यावाक्याला अपशब्द बोलणाऱ्या शिक्षकांना काय बोलणार ?
इंग्रजी झाडणाऱ्या पुणेकर आंग्लांना काहीही न बोलता "फेवर" करणाऱ्या शिक्षिकेचे काय करायचे ? इतकी वर्ष मेडिकल काॅलेज मध्ये शेकडो मुल बघूनही या लोकांची विकृती बरी झाली नाही !
काही मित्रांना "गयेगुजरे" म्हणत शासकीय इमारतींमधल्या केबिनमध्ये बसून बिनधास्त बिड्या पिणाऱ्या शिक्षकांना काय म्हणायच ? मांजर डोळे मिटून दुध पीतं असं म्हणतात.पण प्रौढ असलेल्या मुलांसमोर कसाही छचोरपणा करायचा अन केवळ ते अजून शिकताहेत म्हणून त्यांना झापायच अशा "विदुषी(का)" ना काय म्हणावं ?
काही जणांच्या मते हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच चांगले लोक त्यांना आपल्या मातृसंस्थेत भेटले.पण ते अपवादाने नियम सिद्ध होण्याएवढेच ! अमकी संघटना,तमका महासंघ,आपले आपले लोक,अन अस बरच काही ! पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये अन सगळ्यात प्रेस्टीज असलेल्या कॉलेजमध्ये ऐकल ते चांगल की वाईट हे आयुष्यात सत्याला सामोर जाताना सांगता आल नाही.पण
त्या त्या वेळी मात्र काळजाला "घर" पडली.
अमुकतमुक स्पर्धा घोषित झाली अन तेथे पोचल्यावर ती रद्द झाली,आमची कविता छापायची चुकून (?) राहूनच गेली ! आमचे छंद,एखादा व्यासंग तसाच दुर्लक्षित राहिला पण आमच्या मित्रांनी मात्र नेहमी भरभरून पावती दिली.
वळून पाहताना अस वाटत की एका अर्थी बरच झाल !
आपला मूर्ख भाबडेपणाला वेळीच तडा तर गेला ! म्हणूनच असेल की काॅलेज म्हटलं की हे सगळ कोलून एकत्र असलेले आमचे मित्र आठवतात अन त्यांच्याबरोबरची धमाल !
मोबाईल नव्हताच तेव्हा ! पण संपर्कासाठी घरी कधी साधा फोन करायचा मम्हटले तरी GPO गाठावे लागत असे.चार रुपयात राइसप्लेट अन आठ रुपयात जनसेवाच भरपेट जेवण मिळण्याच्या जमान्यात ४०० मैलांवर घर असलेली मुल फक्त ५०० रुपयात महिना आनंदात घालवत होती.पण ती मुलंच तर होती ! कधी मन दुखल तर मायेनी विचारपूस मित्र सोडून कोणीही करणार नाही हेही त्याच दिवसांनी ठामपणे शिकवलं ! असो !
अव्याहतपणे मनात बरसलेल्या त्या दिवसांना सलाम !
(शब्दसौजन्य -डाॅ.हरीश सरोदे,बी.जे.ची १९८६ तुकडी)






Comments