"गेले ते दिन गेले - भाग ११"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 2 min read
Updated: Sep 3, 2023
"गेले ते दिन गेले - भाग ११"
UG च्या असंख्य आठवणी आज पर्यंत तुम्हाला सांगीतल्या. त्यासाठी लिहावे लागलेले "लांबलचक लेख" सर्वांनी आवडीने वाचले.त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! आगामी सुवर्णमहोत्सवी स्मेहसंमेलनाच्या निमित्ताने आणखीन काही आठवणी सांगतो.ऐका.राजमहालकरांना त्या नक्कीच आवडतील.
BJ चे शैक्षणिक वातावरण सोडून आजूबाजूला खूप काही पाहण्यासारखे असे.शहरवासीयांचे त्याकडे फारसे लक्ष गेले नसले तरी आम्हा वसतीगृहवासीयांसाठी "ससूनबाहेरचे "फुटपाथ" ही एक वेगळीच दुनिया होती.
छोट्या टपऱ्या अन त्यावरची छचोर पुस्तक,अर्धवस्त्रातील उत्तान बायकांची चित्र छापलेली हैदोस,रंगीन राते,अशी नावावरूनच "अंदाज" देणारी "Self Exlanatory" पुस्तक, अन तिथेच जुन्या मासिकांमध्ये मिळणारे मौज,दीपावली, साधना,सत्यकथा,अबकडई सारखे दर्जेदार दिवाळी अंक, पोलिस टाइम्स,रसरंग,चंपक,डिटेक्टिव्ह कथा,शब्द्कोड्यांची पुस्तक यांचे बरेच जण चाहते होते.पाच-दहा रूपयांचे डिपाॅझिट ठेवून रोजचे "चार आणे" अशी वर्गणी देऊन ही "पिवळे साहित्य" वाचायची अनावर ओढ अनेकांना असायची.दर रविवारी मेसमधल्या "फीस्ट" आधी ही "फीस्ट" काही औरच असायची.प्रत्येकाच्या गादीखाली दडवलेले हा "खजिना" दर रविवारी न चुकता बाहेर यायचा व त्याचा "सामूहीक आनंद" लुटला जायचा.
चेक्सचे शर्ट,चट्टेरी पट्टेरी,पांढऱ्या चकचकीत पॅंट्स,स्वच्छ पांढरे शर्ट,मोठेमोठे हातरुमाल,चमत्कारीक combination च्या रंगाचे टी शर्टस्,एकाच धुण्यात पोतेरे होणाऱ्या शाॅर्ट्स, अन झिरझिरीत शर्ट,अन जोरजोरात त्याची जाहिरात करणारे विक्रेते यांच्याकडून अनेक वसतीगृहवाले लुटले गेले आहेत.अशावेळी त्या विक्रेत्याला दिलेला "सामूहीक चोप" आज देखील माझ्या लक्षात आहे.
शेजारी असलेला बुटांचा विक्रेता आदिदास,नायके लिहिलेले १५०-२०० रु. चे बूट काळे,ब्राऊन चकचकीत ऑफिस शूज, त्यावर दांडीला लावलेला फडका वारंवार झटकत धूळ झटकणारा विक्रेता,त्यापलीकडे वेगवेगळी स्वस्त पण चांगली दिसणारी घड्याळ घेऊन बसलेली पोरं यांच्या नादी लागायचे धैर्य मला कधीच झाले नाही.
फुटपाथवरील या विक्रेत्यांकडे तास दीड तासाने छोट्या काचेच्या ग्लासात चहा घेऊन धावणारी छोटी छोटी पोरं, टोकाला असलेल्या पोलिस ठाण्यात येजा करणाऱ्या गाड्या अन तिथेच बाहेर येऊन PMT च्या बंद बसमागे पानाच्या पिचकाऱ्या मारणारे लोक ! या सगळ्यात मळके घाण कपडे अन कराकरा केस खाजवत भिक मागणारी मुल अन
कमरेवर त्याहून लहान गुंगीतल मुल घेऊन भिक मागणाऱ्या दीनवाण्या बायका,आजही माझ्या डोळ्यासमोरून हलत नाहीत.
मधेच चादर अंथरून त्यावर कवटी अन एखाद हाड ठेऊन जादू दाखवणारा जादुगार अन त्याभोवती जमेल तेवढं फुकटात बघाव या विचारात असलेली टाळकी ! हातगाडीवर केळी,निस्तेज फोफ्सी सफरचंद,चिक्कू विकणारी माणसं, शहाळी,काचेच्या चौकोनी पेटीत फणसाचे गरे विकणारे लोक,लालभडक कलिंगड,क्वचित टरबूज बर्फाच्या चुरयावर टाकून वरती मागणीनुसार मीठ मसाला छीलकून देणारे लोक यांनी मात्र मला बर्याच वेळ मोह घातलेला आहे.
या रस्त्याला असलेल्या गल्ल्यांमध्ये दिवसा सुस्तावलेली लॉजेस अन बाहेरील रस्त्यावर अस्ताव्यस्त शरीराच्या चेहेऱ्यावर सूज अन चट्टे असलेल्या मृत नजरेच्या स्त्रिया !
गिचमिडने पार्क केलेल्या गाड्या ! सारखा कंगवा केसावर फिरवीत अन इनशर्ट काळजीपूर्वक राखत कसलीतरी आतुरतेनी वाट पाहणारी माणस ! गळ्यात मोठे मणी असलेल्या माळा,मनगटात कडं घालून किंवा दंडाला बांधलेला तावित चाचपून इकडेतिकडे कुतूहलाने बघणारी आंग्ल स्त्री ! अन तिच्याकडे डोळे फाडून बघणारे खुपसे लोक ! अन या वास्तव दुनियेमधे लपलेले संघाची शाखा भरणारे महादेवाचे मंदीर ! अशी ही आपल्या काॅलेजकाठी असलेली अनोखी दुनिया !
(शब्दसौजन्य -डाॅ.हरीश सरोदे,बी.जे.ची १९८६ तुकडी)






Comments