top of page

मी केलेली पहिली शस्त्रक्रिया

  • dileepbw
  • Aug 31, 2023
  • 2 min read

"मी केलेली पहिली शस्त्रक्रिया"


हरके सरांनी त्यांच्या प्रा.आ.कें.पाथर्डीच्या Tubectomy camp च्या आठवणी सांगताच उषा काळेला तिने केलेले Tubectomy camp आठवले तर माझे मला ! सांगतो.

एका दिवशी ६६३ Tubectomies करणे हे "येरा गबाळाचे काम नोहे,तेथे पाहिजे जातीचे" ! हाच "कुटिरोद्योग" मी सुध्दा

माझ्या जळगावच्या इंटर्नशीपमधे १९७६ साली केलेला आहे.

त्यासाठी मुंबईहून डाॅ.बी.एन.पुरंदरे व डाॅ.सेठ त्यांचे Laparascopes घेऊन जळगावला आले होते.आम्ही लगीन घरातले "नारायण" होतो.

ज्यांची पुस्तके वाचून मी स्त्रीरोग शिकलो ती व्यक्ती व भारतातील पहिला Laparascope पहायला मिळणार म्हणून मी पहाटे पहाटे "अभ्यंगस्नान" उरकून व परीटघडीचा एप्रन घालून मांडवात हजर झालो.आज "हातकी सफाई" पहायला व दाखवायला मिळणार या "भाबड्या आशे" वर दिवसभर राबराब राबलो.पण डाॅ.बी.एन.पुरंदरे व डाॅ.सेठ यांच्या समवेत काम करणे म्हणजे "नृत्यांगना हेमामालिनी" बरोबर "कोरस" मधे नृत्य करण्यासारखेच होते.त्या दिवशी संध्याकाळपर्यंत बिटाडीनने रुग्णांच्या "बेंब्या" साफ करण्याव्यतिरिक्त काहीच करायला मिळाले नाही.हा हंत हंत !

माझे व माझे सहइंटर्न,सध्याचे पुण्याचे प्रख्यात Infertologist डाॅ.संजीव खुर्द यांचे दुर्मुखलेले चेहरे पाहून आमचे जळगावचे दयाळू पण "टकलू" वैद्यकीय अधिकारी डाॅ.उल्हास सोनावणे व डाॅ.देशमुख द्रवले व त्यांनी आम्हाला पुढच्या कॅंपमधे Tubectomy करायला देऊ असे आश्वासन तिथल्यातिथे देऊन टाकले.

थोड्याच दिवसात तो सुदिन उजाडला.प्रा.आ.कें.पहूर व जामदा येथे Tubectomy च्या दोन मोहिमा एकाच दिवशी आखण्यात आला.पहूरला सरदार देशमुख व मावळा खुर्द तर जामद्याला सरदार सोनावणे व मावळा दस्तुरखुद्द असे नियोजन होते.आज नक्कीच "तलवार गाजवायला" मिळणार होती.माझ्या अंगात नुसते वारे भरले होते.युध्दज्वर संचारला होता.पण रुग्णाच्या पोटावर नुसताच "पांढरा ओरखडा" उठला. त्यातून कणभर देखील रक्त आले नाही.सरदार सोनावणे वस्कन माझ्या अंगावर धावून आले व ओरडले "वत्सा ! हा सूर्य आणि हा जयद्रथ ! बिनधास्त चालव तुझी तलवार ! भिऊ नकोस ! मी आहे तुझ्या पाठीशी !"

हे ऐकताच माझ्या अंगात जी "वीरश्री" संचारली ती तलवार थेट पेरिटोनियमलाच जाऊन भिडली.नंतर मात्र हाल विचारू नका ! नदीत कुर्‍हाड पडलेला लाकुडतोड्याचीच गोष्ट आठवली. बुचकळ्या मार मारून थकलो पण "ट्यूब" काही गावेच ना ! शेवटी सरदार सोनावणे पुन्हा एकदा वस्कन माझ्या अंगावर खेकसले "गनीम नजदीक आया हैं ! वो दुसरा सरदार देशमुख ये बात सुनकर इतना खुश होगा की उसके "टक्कल" पर बाल ऊगेंगे !" हे ऐकताच मी त्वेषाने पुन्हा एकदा पोटात बुडी मारली व माझ्या सोबत "ट्यूब" घेऊनच बाहेर पडलो.अशी ही "मी केलेल्या पहिल्या शस्त्रक्रिये" ची चित्तरकथा !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page