top of page

"मातृभाषेतील शिक्षण"

  • dileepbw
  • Aug 31, 2023
  • 3 min read

"मातृभाषेतील शिक्षण"


आज गटावर "मातृभाषेतील शिक्षण" या अराजकीय व अधार्मिक विषयावर चर्चा सुरू असल्याचे पाहून समाधान व आनंद वाटला.आपले त्वचारोगतज्ञ प्राध्यापक डाॅ.पी.बी. जोशीसरांची आठवण झाली.आपल्या मराठीमय इंग्रजीचा यथेच्छा पाणउतारा करीत सरांनी अनेकांचे भर सभेत (क्लिनिक) "द्रोपदी वस्त्रहरण" केलेले अनेकांना आठवत असेल.चंदूला Distant relative ऐवजी Long relative असे म्हटल्याबद्दल "कंच्या गावचं पाव्हनं" असे बोल ऐकून घ्यावे लागले आहेत.तर पुणे विद्यापीठात इंग्रजी भाषेचे प्राध्यापक असलेल्या सुळेसरांचा पुत्र आशुतोष हा देखील त्या तडाख्यातून सुटलेला नाही.इंग्रजी भाषेतील L,M,N अशा मुळाक्षरांना "य" हा मराठी "प्रत्यय" जोडण्याच्या माझ्या "रयत शिक्षण संस्थे" च्या बहुजनी संस्कारांचे "वाभाडे" व "धिंडवडे" सरांकडून मलाही ऐकून घ्यावे लागलेले आहेत.असो.

किशाने पद्मश्री मा.श्री.विठ्ठलराव विखे यांचे "द्रष्टेपण" सांगताना शेतकर्‍यांच्या मुलांचा विकास करण्यासाठी त्यांना "वाघिणीचे दूध" पाजणे आवश्यक आहे हे जाणून थेट ओहायो विद्यापीठातून मा.कै.विलासराव आठरे यांना "लोणी" येथे मायदेशी बोलावून घेतले हे वाखाणण्यासारखे आहे. याची परिणीती म्हणून आज व्हाईट हाऊसची "सेक्युरिटी इंचार्ज" म्हणून लोणीची कन्या कार्यरत असताना दिसते आहे."वाघिणीचे दूध" प्राशन केल्यामुळेच किशा आज HOD व त्याचे बंधू "कमिशनर आँफ इंडस्ट्रीज" झालेले दिसत आहेत.असे "समाजिक भान" असल्याशिवाय राजकारणी मोठे होऊच शकत नाही.असे असले तरी समाजकरण व राजकारण याची सरमिसळ होता कामा नये,हे देखील तेव्हढेच खरे !

राष्ट्रीय विचाराच्या चंदूचे मत ज्ञानासाठी व व्यवस्थापनासाठी कोणतीही परकीय भाषा अवश्य शिकावी.पण मेकाॅलेसारखा देशाची अस्मिता व अभिमान मारण्यासाठी त्याचा "गैरवापर" हा अनाठायीच ! तर त्याहून भिन्न राजकीय विचारणी असलेल्या आरतीला मात्र ती "गुलामगिरी" वाटत नाही. जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजी आलेच पाहिजे.

तिच्या मते "मराठी प्रेम" हे केवळ दुसऱ्यांना सांगायला !

सुनीलच्या दोन्ही मुली "मराठी" मिडीयममधे शिकल्या आहेत.पुढे सेमी घ्यावे लागले.ब्रिटिश सत्ता नसलेल्या बहुतांश देशात स्थानिक भाषेत शिक्षण देतात.त्यांचा विकास खुंटला आहे का? उलट तंत्रज्ञानात इंग्लंडपेक्षा पुढे आहेत.मातृभाषेत शिक्षण घेणे सोपे जाते असे मत त्याने मांडले आहे व ती त्या मताशी १००% सहमत आहे.

मंगलच्या मते जिथे जरुरी आहे ते परकीय भाषेतून जरूर शिकावं,पण त्यासाठी इंग्रजीचा आग्रह नको.कारण भाषेबरोबरच "संस्कृती" ही बदलत जाते."पाश्चात्यांचं अंधानुकरण" सुरू होते.भाषा,ज्ञान आणि उत्कर्ष ही शेवटी तुमच्या क्षमतेवर व प्रयत्नांवरच अवलंबून असतात.शालेय शिक्षण व व्यवहारातलं ज्ञान ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. माणसाची वैचारिक बांधणी व दुर्दम्य इच्छा शक्ती ही महत्वाची ! शिक्षणामुळे फक्त आर्थिक द्रुष्ट्या सक्षम होणे महत्वाचे नाही तर त्यातुन कौटुंबिक व सामाजिक संबंध जपणारा "चांगला नागरिक" घडणे महत्वाचे आहे.त्यावर आरतीने असे आदर्श आहेतच कुठे ? असा सवाल केला आहे.चांगल शिक्षण घायला "इंग्लिश" ची नक्किच गरज आहे या मुद्यावर ती ठाम आहे.या गटावर "शब्दमर्यादा" असल्याने मी माझे मत drwani.net या माझ्या ब्लाॅगवर मांडतो. ज्यांना वाचायचे आहे त्यांनी अवश्य वाचावे.अजिबात आग्रह नाही.

जयंत सरवटे व त्याची मुले पण मराठी माध्यमामधूनच शिकलेली आहेत.कारण त्यावेळी शिक्षणाचा आणि शिक्षकांचा दर्जा मराठी शाळांमध्ये सुद्धा अतिशय चांगला होता.ती परिस्थिती आत्ता मराठी शाळांच्या बाबतीत काय त्याच्या नातींच्या इंग्लिश मिडीयम च्या शाळांच्या बाबतीतही वाटत नाही. त्यामुळे त्याला स्वतःला मुलांनी मातृभाषेमध्ये शिक्षण घ्यावे असे जरी वाटत असले तरी इंग्लिश मीडियम ला पर्याय दिसत नाही कारण पुढे जाऊन त्याचाच उपयोग होणार आहे.बाळच्या या मतावर चंदूने विरोध पत्करून त्याच्या "गंगादेवी रामजीवन कासट स्कूल,सुरत" या शाळेत इंग्रजी माध्यम सुरू करण्याची प्रत्यक्षात केलेली कार्यवाही महत्वाची ठरते.

जयाच्या मते हायर टेक्निकल एज्युकेशन आणि मेडिकल एज्युकेशन साठी कॉन्टेम्पोररी इंग्लिश चांगलं असणं खूप जरुरी आहे.लिटररी इंग्लिश चांगलं असण्याची काही जरुरी नाही.कारण या कोर्सेसचे मराठी भाषेमध्ये ज्ञान उपलब्ध नाहीये चांगल्या पद्धतीने ! हे सत्य आहे व मी त्याच्याशी सहमत आहे.त्यामुळेच जिथे "साहित्यिक मूल्य" जपायचे तेथे मी मातृभाषा वापरणे पसंत करतो व जेथे विज्ञान सांगायचे तेथे "कॉन्टेम्पोररी इंग्लिश" वापरतो.पण लक्षात कोण घेतो ?

सगळ्यांची मते वाचल्यानंतर "मातृभाषेतील शिक्षण" या विषयावरची माझी मते सांगतो.माझ्या मते "ज्ञान" या गोष्टीला भाषेच्या मर्यादा नसतात.आपण शरीररचना कोणत्या भाषेत शिकलो ? "इंग्रजी" हे उत्तर देण्याची घाई करू नका. शरीररचनेतील बहुतेक सर्व नावे "लॅटिन" भाषेतील आहेत. का ? त्याचे जे उत्तर सापडेल तेच उत्तर तुम्हाला "भारतीय ज्ञान" कोणत्या भाषेत आहे त्याच्या कारणाकडे घेऊन जाईल.ज्या कारणाने ही "भारतीय भाषा" लुप्त झाली,त्याच कारणाने हे "भारतीय ज्ञान" देखील लुप्त झालेले आहे.ते पुन्हा प्राप्त करून घ्यायचे असेल तर ह "भारतीय भाषा" शिकण्याला पर्यायच नाही.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page