"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ५"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 1 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ५"
©दिलीप वाणी,पुणे
"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !
विजय भंगाळेच्या मार्गदर्शनाखाली पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटमधे एक एक दिवसाने माझे ज्ञान वाढू लागले.श्रिनिवास गोखले हे माॅडर्न हायस्कूलचे विद्यार्थी ! माझा सख्खा मित्र ENT चा अविनाश वाचासुंदर पण माॅडर्न हायस्कूलचाच विद्यार्थी ! त्यामुळे तो अधून मधून गोखलेसरांकडे माझ्या अभ्यासाची चौकशी करीत असे.गोखलेसर माझ्या देखतच "आहे ! काही तरी "स्पार्क" आहे !" असे म्हणत असत व माझ्या अंगावर मुठभर मास चढत असे.
माझ्या हाॅस्पीटल बॅचमधे केस प्रेझेंटेशनची जबाबदारी तहहयात माझ्याकडे असायची,ही बातमी श्रिनिवास गोखले सरांना कळताच त्यांनी व मकरंद बापट सरांनी मला न सांगताच एक "बेत" आखला.त्यांनी मला न सांगताच थेट पॅथाॅलाॅजी लेक्चर हाॅलमधे माझे व्याख्यान आयोजित केले व झाडून सर्व टिचिंग स्टाफला(HOD पासून ते RP पर्यंत सगळे) आमंत्रित करून ठेवले.
मी म्युझियममधे बसून डबा खात असताना पंधरा मिनिटे आधी मला ही बातमी सांगण्यात आली.एप्रन शोधण्यापासून माझी तयारी सुरू झाली.हे "रॅगिंग" आहे हे स्पष्ट होते.त्यामुळे "आलीया भोगासी असावे सादर" असे म्हणत मनाची तयारी केली. नाही पॅथाॅलाॅजी सांगायला जमले तर "क्लिनिकल" सांगून वेळ मारून नेऊ असे मनाशी ठरवून पॅथाॅलाॅजी लेक्चर हाॅलमधे प्रवेश केला.
समोर रणनवरे सरांपासून आगरवाल सर,करंदीकर मॅडम, दांडेकर मॅडम,जोशी मॅडम,पै मॅडम,प्रधान,गोखले,बापट,असे सगळे प्राध्यापक,दिवाणे,शिनगारे,लागू,पंडीत,पाटील असे सगळे ज्येष्ठ बसलेले पाहून खरे तर माझा "कुरूक्षेत्रावरचा अर्जुन" झालेला होता.पण विजाने मला "कर्मण्येवाधिकारस्ते"
असा सल्ला देऊन युध्दभूमीवर ढकलले.लेक्चर छानच झाले व तत्क्षणी पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा माझ्यावरील रोष कुठल्या कुठे पळून गेला.






Comments