top of page

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ८"

  • dileepbw
  • Sep 1, 2023
  • 1 min read

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ८"

©दिलीप वाणी,पुणे

"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !

आपल्या पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण म्हणजे विजय भंगाळे हा माझ्या MD परीक्षेचा Expert ! परीक्षकांची सरबराई करताना त्याने आमच्याकडे जराही दुर्लक्ष केले नाही.परीक्षकांसाठी करंदीकर मॅडम घरून डबा घेऊन यायच्या.तर विजाने परीक्षार्थींच्या भोजनाची जबाबदारी श्रीमंत अडसूळची पत्नी भिकू अडसूळ(बाविस्कर) हीच्याकडे लावून दिली होती.परीक्षक टीचर्स रूममधे तर परीक्षार्थी म्युझियममधे अशी भोजन व्यवस्था विजाने लावली होती.आकारमानामुळे विजाने लाडाने माझे नाव "गणपती" असे ठेवले होते.तो खुशाल परीक्षकांना सांगायचा ! माझा "गणपती" जेवला का ते बघून येतो.मगच पुढची परीक्षा सुरू करा.

ग्राॅसिंगला मला Haemchromatosis ची केस होती.सर्व ऑरगन्स बारकाईने तपासून झाली.पण शोध काही लागेना.भीमाने जरासंधाला पटकावे तसे मी एकएका ऑरगनला "धोबी पछाड" देत होतो.तरी कोणताच ऑरगन काहीच बोलेना.

मी हताश झालेला पाहून परीक्षेचा Expert असलेल्या विजाने "कृष्ण शिष्टाई" केली.ड्रममधले सगळे अवयव पुन्हा नीट काढून पहा,ही सूचना मिळताच मी पुन्हा ड्रममधे बुचकुळी मारली व हाताला गवसलेला प्रशियन ब्ल्यू रिॲक्शन केलेला लिव्हरचा "निळाशार तुकडा" घेऊनच बाहेर आलो.

"युरेका युरेका !" असे न ओरडता धोरणीपणाने तो तुकडा गुपचूप एप्रनच्या खिशात लपवला व साळसुदासारखा परीक्षकांकडे जाऊन तोंडी परीक्षा द्यायला ऊभा राहिलो. कोपर्‍यात गालात हसत ऊभा असलेला "Expert विजा" तेव्हा मला गवताची काडी मोडून फेकणार्‍या श्रीकृष्णासम भासत होता !


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page