"गेले ते दिन गेले - भाग १२"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
Updated: Sep 3, 2023
"गेले ते दिन गेले - भाग १२"
UG च्या असंख्य आठवणी आज पर्यंत तुम्हाला सांगीतल्या. त्यासाठी लिहावे लागलेले "लांबलचक लेख" सर्वांनी आवडीने वाचले.त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! आगामी सुवर्णमहोत्सवी स्मेहसंमेलनाच्या निमित्ताने "शिरूरच्या इंटर्नशिप" च्या काही जमा केलेल्या "ऐकीव आठवणी" सांगतो.कारण माझी इंटर्नशिप शिरूरला झालेली नाही,तर ती झाली आहे मोरगाव सुपे येथे ! त्यामुळे शिरूरला झालेल्या अपघाताची चित्तरकथा ब्रेझनेव्ह पवार सांगेल.मी बाकीच्या सांगतो.
बी जे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या असंख्य मंडळींसाठी शिरूरची रुरल पोस्टिंग म्हणजे एक सुवर्णकाळच होता.अनेकांच्या "गोड गुलाबी" अंगावर शिरशिरी उठवणाऱ्या आठवणी या टापुशी सबंधित आहेत.
शिरूरचे क्वार्टर्स,मोकळी जागा,निसर्गरम्य परिसर अन अतिशय उत्तम जेवण यामुळे तो कायमच "हाॅटस्पाॅट"असे. पुण्यापासून जवळ असणे हा सुद्धा एक मुद्दा ! आजूबाजूला देखील निघोजचे रांजण खळगे,करडे येथील झुकता मनोरा, रांजणगाव गणपती अशीही आकर्षणे होतीच.पण पूर्ण मोकळेपण,मनाला फुटलेली "पालवी" अन प्रेमात पडण्यायोग्य वातावरण यामुळे आपल्या "हृदयाचा कौल" येथे आजमावणारे अन त्यात यशस्वी होणारेही अनेकजण होते.
मुलींबरोबर OPD बघणे,रुरल OPD एकाच गाडीतून "हवेहवेसे धक्के" खात करणे,"चिडवा-चिडवी" मुळे आतून मोहोरून येण अन वरून लटका राग दाखवण,सुरेख चांदण्याच्या रात्री जागवून गाण्याच्या भेंड्या म्हणणे,अन कधी एकमेकांच्या डोळ्यात हवीहवीशी खूण सापडते का ? हे मंत्रमुग्ध होऊन बघणे ! तरीही ओळख पटली तरी कोणी आधी विचारायचे यात काहीजण एकमेकांच्या patience ची परीक्षा बघत असत ! म्हणजे ज्याने आधी विचारले तो कायम दुसऱ्याच्या अधिपत्याखाली संसार करणार अशी "strategy" मांडणारे सुद्धा अनेकजण होते.
अर्थात या सर्व "सांगीवांगी" च्या गोष्टी ! दुरूनच ऐकलेल्या ! पण अनेकांच्या आयुष्यात गुलमोहरासारखं बहरत जाणाऱ्या प्रेमाच्या आठवणी देणाऱ्या त्या ठिकाणाला त्रिवार सलाम !
जाता जाता काॅलेजसाठी एक सूचना ! "गाईडन्स" अभावी प्रेमात मार खायचा नसेल तर FM च्या दिलीप सप्रेंसारखे "मार्गदर्शक" ठेवायला हवे शिरूरला ! "छोटीसी बात" मधल्या अशोककुमार सारखे !






Comments