"गेले ते दिन गेले - भाग २"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 2 min read
Updated: Sep 3, 2023
"गेले ते दिन गेले - भाग २"
UG च्या असंख्य आठवणी आज पर्यंत तुम्हाला सांगीतल्या. त्यासाठी लिहावे लागलेले "लांबलचक लेख" सर्वांनी आवडीने वाचले.त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! आपले "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन" जवळ येऊन ठेपल्यामुळे काॅलेजच्या काही आठवणींना पुन्हा उजाळा देऊ या.या ह्रद्य आठवणींना कृपया धार्मिक व राजकीय वळण देऊ नये व त्याची "लांबलचक" अशी हेटाळणी करू नये ही नम्र विनंती.
पावसाळा,उन्हाळा,हिवाळा ऋतू कोणताही असो,होस्टेल समोरचे "सेन्ट्रल हॉटेल" हा नेहमीच अनेकांचा "फेवरिट अड्डा" असायचा."इराणी चहा" अन "बनमस्का" तिथे खाऊन तासंतास बसण्यासारख सुख नव्हतं ! त्याचे वेगळे केक, बिस्कीट,भुर्जी अन टूटीफ्रुटी घातलेला पाव हे त्याच्या सम तेच !
अनेक वर्षे तेथेच काम करणारा व सर्वांना ओळखणारा "रामन" नावाचा वेटर कामाला खूपच चटचटीत ! अत्यंत सह्लदय ! मला पहिल्यांदाच सिगारेट ओढताना पाहून रागे भरणारा "रामन" रंगात असेल तेव्हा त्याच्या मुलखाच्या गोष्टी सांगत असे.कधी उसने पैसे पाहिजे असतील तर "रामन" हा अनकांचा "Universal Donor" असे.नक्कीच त्याचा रक्तगट "O Negative" असावा !
"सेन्ट्रल हॉटेल" समोरचे "सेन्ट्रल बिल्डिंग" हे सरकारी कार्यालय म्हणजे माझ्या तीर्थरूपांचे कार्यालय ! मी पाचवीत असताना ते महाराष्ट्र राज्य शासनाचे "क्रीडाधिकारी(SIPE)" होते.शेजारीच महत्वाची "कलेक्टर कचेरी" ! तसेच आंबेडकरांचा पुतळा देखील तिथेच ! त्यामुळे विविध मोर्चे, धरणी,घोषणा अन नाना प्रकारचे लोक सतत येउन जाऊन ! त्यामुळे "सेन्ट्रल" मध्ये फार प्रकारची माणस सातत्याने बघायला मिळत असत !
शबनम लटकावून तासंतास चर्चा करणारे दाढीवाले विचारवंत,हापिसातल्या सायबाची चेष्टा करत ३ बाय ६ चहा पिणारे लोक,दुपारच्या उत्तरार्धाच्या थोडस आधी फ्यामेली रूम मध्ये आधी घुसणारी बाई अन नंतर इकडेतिकडे बघत धडपडत घुसणारा माणूस ! यथावकाश आतून येणारी कोकाकोलाची ऑर्डर,सायलेन्सर काढून विमानासारखे आवाज करणाऱ्या बाईक्स अन लालबुंद तोंडाचे,धिप्पाड सतत सिगारेट ओढणारे इराणी,अन त्यांना कवटाळून मागे बिलगणाऱ्या तशाच सौष्ठवपूर्ण मुली ! कुठेतरी कोपऱ्यात साध्या पेहेरावातला माणूस अन केकच्या बशीकडे
आश्चर्यचकित होऊन मोठे डोळे करणारं निरागस शाळकरी पोर ! त्याच्या नजरेत तर सर्व हव असायचं पण डोळे पटकन बापाचा अंदाज घेणारे !
हे सगळ बघत खरच वेळ निघून जायचा ! नकोस वाटणार काॅलेज टाळण्यातच आनंद व्हायचा !
(शब्दसौजन्य -डाॅ.हरीश सरोदे,बी.जे.ची १९८६ तुकडी)






Comments