"गेले ते दिन गेले - भाग ४"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 2 min read
Updated: Sep 3, 2023
"गेले ते दिन गेले - भाग ४"
UG च्या असंख्य आठवणी आज पर्यंत तुम्हाला सांगीतल्या. त्यासाठी लिहावे लागलेले "लांबलचक लेख" सर्वांनी आवडीने वाचले.त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! आपले "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन" जवळ येऊन ठेपल्यामुळे काॅलेजच्या काही आठवणींना पुन्हा उजाळा देऊ या.या ह्रद्य आठवणींना कृपया धार्मिक व राजकीय वळण देऊ नये व त्याची "लांबलचक" अशी हेटाळणी करू नये ही नम्र विनंती.
आपल्या मातृसंस्थेशेजारील मिलिटरीच्या परिसरातून जाताना ओसाड वाटणारी मैदाने,अर्धवट पडझड झालेल्या जुन्या वास्तू,निखळलेले दगडी चिरे,लांबलांब असलेले दगडी बांधकामाचे प्रतवारीनुसार असलेले रहिवासी ब्लॉक्स, पावसाळी ऋतूत पडलेला पालापाचोळा,वरती असलेली आसपासच्या डेरेदार झाडांची सावली,त्यातूनच गेलेली सायकल अथवा बैलगाडीनेही रुजवलेली कच्ची वाट, पायाखालचा तो पिवळा,तपकिरी,हिरवट पानांचा सडा अन आसपास फुललेला लालभडक गुलमोहोर ! हे असे "अवशेष" हलकेच आपल्याला कधी मागे घेऊन जातात हे समजतच नाही.
अशाच एका दृश्यात एका पडझड झालेल्या भिंतीजवळ थांबलेली करडी कबरी गाय अन तिचे मस्तक आणि गळ्याखालची पोळी मायेने घासणाऱ्या दोन परकरी मुली बघून तर मन एकदम दाटून आले.ठिकठिकाणी उभारली गेलेली विविध आधुनिक सोयी सुविधांची संकुले,काचेच्या निळ्या आच्छादनांनी झाकलेल्या महाकाय इमारती,सतत दुरुस्तीची कामे चाललेले रस्ते,मेट्रो,उड्डाणपुलांची कामे अन गर्दी,खोळंबा,गाड्या,रिक्षा,उडून जाणारा किमती वेळ अन बघता बघता यंत्रवत होत गेलेले अवघे आयुष्य !
१९७३ साली बीजे ला शिकायला आल्यावर दगडी बांधकामाचे हॉस्टेल,पावसाच्या जोरकस धारा,सेंट हेलेना अन होस्टेलच्या E ब्लॉकमागील झाडांनी पूर्ण आच्छादलेला रस्ता,हिरव्या अन लाल रंगाचा पाना फुलांचा उत्सव अन तरुणाईच्या जोशात न्हाणारी मन अस सर्व "गारुड" फार मोठं होत.ते आजही तेवढ्याच ताजेपणाने आठवते हा स्वतःसाठीचा नव्हे तर सर्वांसाठीच अनमोल ठेवा!
आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने रोज कुणीतरी त्या वेळचे फोटो प्रसृत करीत आहेत.ते पहाताना या सर्व अनमोल आठवणी अंगावर "गोड शिरशिरी" आणतात.ते वय,सर्वांचे हसरे चेहेरे,डोळ्यातली चमक अन अस्फुट स्वप्न, क्या बात थी !
आताची सर्वांची वेगवान आयुष्ये,मोबाईलचा अतिरेक,नेटचा अतिरेक,प्रत्यक्ष आयुष्यापासून झालेली फारकत अन हळुवार विसरून चाललेले मैत्र,स्पर्श,निसर्ग अन ओल हातून निसटू नये हीच सर्वांना सदिच्छा !
(शब्दसौजन्य -डाॅ.हरीश सरोदे,बी.जे.ची १९८६ तुकडी)






Comments