"गेले ते दिन गेले - भाग ५"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
Updated: Sep 3, 2023
"गेले ते दिन गेले - भाग ५"
UG च्या असंख्य आठवणी आज पर्यंत तुम्हाला सांगीतल्या. त्यासाठी लिहावे लागलेले "लांबलचक लेख" सर्वांनी आवडीने वाचले.त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! आपले "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन" जवळ येऊन ठेपल्यामुळे काॅलेजच्या काही आठवणींना पुन्हा उजाळा देऊ या.या ह्रद्य आठवणींना कृपया धार्मिक व राजकीय वळण देऊ नये व त्याची "लांबलचक" अशी हेटाळणी करू नये ही नम्र विनंती.
एप्रिलच्या महिन्यात शेवटी शेवटी वळवाचा जोरदार पाऊस होऊन होस्टेलचा जो "माहोल" व्हायचा,त्याबद्दल या लेखात सांगतो.
असा एप्रिलच्या मध्यावर पडलेला पाऊस ! पुस्तक टाकून देऊन वसतिगृहांच्या व्हरांड्यात आलेले मित्र ! ते थेंब अंगावर घ्यायला धावलेला मी ! अन अत्तरासारखा मातीचा सुवास घेत धुंद झालेलं मन !
अचानक ओलाव्याची,दिलास्याची वसतिगृहावर पसरलेली संध्याकाळ ! निक्या,दिल्या,राजा अशा हिकमती लोकांनी अचानकच आणलेला/जपून ठेवलेला "रमचा खंबा" ! त्यातच रोहिदाससारख्या संगीतप्रेमी तानसेनांनी छेडलेली किशोरदांची अकेली गाणी ! तलतचा काळीज दुखावणारा आवाज अन एकेक मणी गळावा अन माळ मोकळी व्हावी तसे सैलवणारे मित्र !
कुणाची चेष्टा,कुणाची(त्याला) हवीहवीशी वाटणारी चेष्टा,
कुणाच दाबून ठेवलेलं दुख्ख,कुणाला घरची आठवण येऊन
सैरभैर झालेलं मन,कुणाचा झाकलेला राग ! काय काय येत असे "जादूगाराच्या पोतडी" तून बाहेर येणाऱ्या चीजांसारखं !
कसले बंधन नाही,अभ्यासाव्यतिरिक्त आणखीन चिंता नाही,
आयुष्याची भव्यदिव्य स्वप्न (सुदैवानेच ) नाहीत,फक्त सोबतीने अनाकलनीय,अचंबित अन विश्वास गमावण्यासारखा कालखंड पार करण्याची इच्छा !अन त्यात अशा पावसाने उडवून दिलेली बहार ! मरगळ आलेल्या मनांना दिलेला ताजवा ! अन आज ?
पाऊस कसाही जिवलगासारखा बिलगो,त्याचा उत्सव करायला ते जुने अनमोल आता नाही ! चिंता,तक्रारी, कैफियती अनेक असतील पण तो "माहोल" आता नाही,
आनंदही भरपूर असतील ते वाटायला खरेखुरे लोक सहजी नाहीत.पण तोच मृदगंध,त्याच आठवणी अन अजून हे जाणवणार मन आहे … चीअर्स …।
(शब्दसौजन्य -डाॅ.हरीश सरोदे,बी.जे.ची १९८६ तुकडी)






Comments