top of page

"गेले ते दिन गेले - भाग ६"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 2 min read

Updated: Sep 3, 2023

"गेले ते दिन गेले - भाग ६"

UG च्या असंख्य आठवणी आज पर्यंत तुम्हाला सांगीतल्या. त्यासाठी लिहावे लागलेले "लांबलचक लेख" सर्वांनी आवडीने वाचले.त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! आपले "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन" जवळ येऊन ठेपल्यामुळे काॅलेजच्या काही आठवणींना पुन्हा उजाळा देऊ या.या ह्रद्य आठवणींना कृपया धार्मिक व राजकीय वळण देऊ नये व त्याची "लांबलचक" अशी हेटाळणी करू नये ही नम्र विनंती.

मेडिकलला असताना दिवस,रात्र,सणवार,उसंत याचा काही काही टप्प्यांवर काहीच संबंध उरत नाही.याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी रेसिडेंसीमधली "दिवाळी पहाट" ! पहाटे पाचला जो "डेड हाऊस" मधे शिरलो ते थेट दुपारी एकला भोजनालाच बाहेर आलो ! अशी डेड बाॅडीजची लाईन लागली होती.

वैद्यकीय महाविद्यालयात दिवसेंदिवस अभ्यासाच्या,कष्टाच्या चरकात पिळून जाताना नेहमीचे सामान्य आयुष्य जणू संपूनच जाते.सकाळी उठले,आवरले,नाश्ता केला!लायब्ररी गाठली,पुस्तकात बुडलो,मधेच चहा,परत पुस्तक,जेवायला होस्टेलला,भोजनोत्तर झोप न येऊ देण्याचा आटोकाट प्रयत्न करत परत अभ्यास चहा,जेवण,लायब्ररी हे चक्र अविरत सुरुच असायचे .

परवा खिडकीतून बाहेर बघितलं तर अशीच ती "हुरहुरती संध्याकाळ" थबकलेली जाणवली.बाहेर पडून अंगणात आलो.झोपाळ्यावर बसलो आणि सावकाश पीत राहिलो.त्या संध्याकाळचा स्पर्श,तो प्रकाश,पहाट कि अंधार व्हायच्या आधीचा क्षण हे न कळणारी वेळ,परतणारी पाखरे,झाडांच्या फांद्या आणि पानांच्या पलीकडे परत तसेच गर्द निळे होत चाललेले आभाळ ! अशा संध्याकाळचा असा हळव्या वेळचा "प्रकाश" मनाला आजदेखील खूपच अस्वस्थ करून जातो.

रस्त्यावरून जाणारी कुटुंबे,रमतगमत वेळ काढणारी जोडपी, मौजमजा करणारी लोकं बघितली की असं वाटायचं आपण वर्षानुवर्षे असं जगलोच कुठे ? त्यात आईवडील आठवायचे. ते आता काय करत असतील ? वडील बातम्या ऐकत असतील.आईने कुकर लावला असेल.जोडीला सांजधारा अथवा तसाच कुठला चांगल्या गाण्यांचा कार्यक्रम असेल आणि आपण किती दिवस असे जगतो आहोत ?आज किती तारीख आहे आज कोणता वार आहे ? किती दिवसात घरच अन्न खाल्लं नाही ! तो फडफडीत भात,एकच मसाला वापरून केलेल्या भाज्या,पोचट मसुराची उसळ,मोठे कोबीचे न शिजलेले तुकडे टाकून केलेली भाजी,कधी बाहेर जेवलं तर तेच ते पंजाबी मसाल्याचं एका मुशीतून काढलेलं जेवण !यादी संपायची नाही ! पालेभाज्या,भाकरी,मऊसूत पोळी, ताज ताक,थालीपीठ,लोण्याचा यथेच्छ गोळा याच्या आठवणीनं एकदम गहिवरून यायचं !

रविवारी मेस बंद असायची ! त्यावेळेस बाहेर फिरायला गेलं तरी लक्ष आसपासच्या घरांमध्ये रेंगाळायचं.खिडकीतून अथवा बैठ्या घराच्या दारातून दिसणारी संध्याकाळची लगबग, कुठे देवासमोर लागणारा दिवा,फोडण्यांचे सुगंध आणि चर्रर्र असे आवाज,एखादी आईच्या वयातली बाई काम करताना दिसणारी हे सगळं बघून पोटात गोळा उठायचा आणि साक्षीला ती हुरहुरती संध्याकाळ असायचीच !

अशी उणीपुरी ८-१० वर्षे टोकाच्या वातावरणात काढलेले लोक खूप वेगळे असतात.खाण्यापिण्याची कटकट,वेळ उगाचच वाया घालवणे,दिवसाच्या विविध प्रहारांचे सौन्दर्य आहे तिथून न अनुभवणे असं हि लोक करत नाहीत आणि करत असतील तर त्यांनी स्वतःसाठी बदलायला हवे.आता या आठवणींच्या प्रपाताने आपल्या मुलाबाळांना तसे कळेल कि नाही हा वेगळा भाग पण आपल्याला कळत असेल तर आपण ते जगले पाहिजे,एकदा मोठ्या कालावधीत जे निसटलेले आहे ते आता निसटू देऊ नये !

(शब्दसौजन्य -डाॅ.हरीश सरोदे,बी.जे.ची १९८६ तुकडी)

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page