top of page

"गेले ते दिन गेले - भाग ७"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 2 min read

Updated: Sep 3, 2023

"गेले ते दिन गेले - भाग ७"

UG च्या असंख्य आठवणी आज पर्यंत तुम्हाला सांगीतल्या. त्यासाठी लिहावे लागलेले "लांबलचक लेख" सर्वांनी आवडीने वाचले.त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! आपले "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन" जवळ येऊन ठेपल्यामुळे काॅलेजच्या काही आठवणींना पुन्हा उजाळा देऊ या.या ह्रद्य आठवणींना कृपया धार्मिक व राजकीय वळण देऊ नये व त्याची "लांबलचक" अशी हेटाळणी करू नये ही नम्र विनंती.

ते कनिंगहॅम,चौरसीया,डेब,गायटन अन त्यावरची काळी रेक्झीनसारखी कव्हरे ! Physiology मध्ये करुण रडणारी कुत्री ! प्रयोगशाळांमधली चकचकीत पांढरी बेसिन्स !

मार्दवतेचा लवलेश नसलेले काही शिक्षक ! बारावीनंतर एकदम प्रचंड पुस्तके पाहून दडपलेली छाती !

असच सगळ असताना छान हसणाऱ्या मुली,अन त्यांचे नीटस कापलेले केस ! पटकन उत्तर देण्याची अन कशालाही न डरता पुढे होणारे नीडर बुद्धिमान लोक !

होस्टेलचे नव्या लोकांना वाटणारे जरबयुक्त वागणे ! उगाचच येताजाता माप काढणारे काही सिनियर्स ! अंघोळीचा नंबर ! पारे उतरलेलं आरसे ! वसकन अंगावर येणारे exam गोइंग लोक ! वेळी अवेळी आंघोळ करणारी मंडळी ! सकाळी लेक्चरला येणारी अनावर झोप ! सबमिशनला खाल्लेली बोलणी ! सैरभैर होणार मन !

आपल्यासारखे कोणी आहेत का अजून ? याचा शोध !

एकमेकांनी पुढे केलेला सोबतीचा हात ! हळूहळू समजणारे वेगळेच विश्व ! आधी भीती वाटणारे पण नंतर मैत्री होणारे अनेकजण ! अभ्यासाच्या दंग्याच्या चमत्कारिक माहित्यांचा

अन त्यातील विविध टिप्स चा उगम ! पहिली परीक्षा अन त्याचे मार्क !

आपल्याला मेंदू आहे की नाही अस वाटण्याची अवस्था !

आपली लाज बघून हसणारी मुल अन त्याचाही मजाक करणारे बिलिन्दर ! वेगाने धावणारे दिवस अन वेगाने लयास जाणारे भाबडेपण ! पराकोटीचा दंगा टीपेचा गोंधळ !

निवडणुका अन उमजलेल राजकारण ! तेवढ्या काळापुरती दहशतवादी वाटणारी काही टोळकी ! शिव्या शाप मारामाऱ्या पण तरी मर्यादेतच !

उत्सवी वातावरणे ! सकाळी नाहून साड्या नेसून

सारसबागेतल्या तळ्याच्या गणपतीला जथ्याने जाणाऱ्या

होस्टेलच्या मुली अन दगडूशेठला जाऊन तोंडात मारून घेऊन पुटपुट करणारी मुल ! मुलींच्या परीक्षेसाठी होस्टेलला येउन राहणाऱ्या आया ! त्यांच्यावर डाफरणाऱ्या काळजीने त्रस्त मुली ! अन हळूहळू आपल्याला कवेत घेऊन मोठ करणार हे सगळ !

(शब्दसौजन्य -डाॅ.हरीश सरोदे,बी.जे.ची १९८६ तुकडी)


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page