top of page

"गेले ते दिन गेले - भाग ९"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 4 min read

Updated: Sep 3, 2023

"गेले ते दिन गेले - भाग ९"

UG च्या असंख्य आठवणी आज पर्यंत तुम्हाला सांगीतल्या. त्यासाठी लिहावे लागलेले "लांबलचक लेख" सर्वांनी आवडीने वाचले.त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! आज

"बीजेच्या हृदयस्पर्शी आठवणी" सांगतो.

कोरा कागद... निळी शाई...

आम्ही कुणाला भीत नाही...

दगड का माती....

असे खेळ खेळत मोठी झालेली आपली पिढी ! या निळ्या शाईने आपल्याला सहनशीलता दिली,उज्वल भवितव्य दिलं, लढण्याचं बळ दिलं ! पेन मध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी.....

दुकानदार ही शाईचे थेंब मोजुन पेन मध्ये टाकायचा.

आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. कधी शाई हातावर सांडायची,ती तशीच डोक्याला पुसायची.

कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी....

या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं.

तो शाई मिळाल्याचा आंनद भारीच होता.

हीच सहनशीलता पुढे रक्तपेढीत काम करताना कामाला आली.पुन्हापुन्हा त्याच त्या लॅटेक्सच्या रबरी नळ्या व बोथट झालेल्या सुया वापरून किती जणांनी रक्त संकलन केलेले आहे ?

आमच्या पिढीने आई,बापाचा कच्चून मार खाल्ला,भरीस भर म्हणून एकत्र कुटुंबातील काका,काकी,मावशी,आत्या,मामा, मामी,आजी,आज्जा आणि उरला सुरला गल्लीतील मोठ्या माणसांचाही.तरीही त्यात खूपच मजा होती रावं....

शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती.कान धर,कोंबडा हो,बेंचवर उभे रहा,अंगठे धर,वर्गाबाहेर उभे रहा,

अशा सगळ्या शिक्षा निमुटपणे हसत-खेळत सहन केल्या....

शिक्षकांच्या सपासप छड्या खाल्ल्या. यातुनही सहनशीलता वाढली. पण त्या शिक्षणाची गोडीपण न्यारीच होती.

बालपणी अंगी बाणलेली ही सवय रेसिडेंसीमधे चांगलीच कामाला आली.JR असताना SR च्या,SR असताना CR च्या व CR असताना Lecturer च्या शिव्या खातखातच आपण MD झालो.सलग २४ तास न कंटाळता ED केली.एकाच दिवसात अर्धा डझन PM केली.भारत फोर्ज सारख्या ठिकाणी एकाच दिवसात ५०० जणांचे रक्त संकलन करून घेतले.रायचूरसरांपुढे उपाशीपोटी तासनतास Grossing केले.

जुन्या कपड्यांची शिऊन घेतलेली दप्तरे वापरलेली आमची पिढी... दप्तरे म्हणजे तरी काय,तर कापडाची पिशवी.फार तर काय त्यालाच आतुन कम्पास ठेवण्यासाठी केलेला कप्पा... असं दप्तर आता पुन्हा भेटणे नाही,शाळेतून आल्यावर भिरकवायला मजा यायची! आणि आई खेळायला चाललो असं ओरडायलापण मजा यायची.

वैद्यकीय महाविद्यालयात या दप्तरची जागा "एप्रन" ने घेतली. बाॅसचा Full Sleeve अप्रन" मनाला भुरळ घालत असताना रेसिडेंसीची पहिली काही वर्षे MBBS च्या "एप्रन" वरच काढावी लागली.

"वॉटर बॅग" नावाचा प्रकार तर आमच्या बालपणी अस्तित्वातच नव्हता.सरळ जाऊन शाळेतील हौदाच्या नळाला तोंड लावून पाणी प्यायचे... हौद धुतलेला आहे का नाही,पाणी स्वच्छ आहे का नाही हा विचार मनात नसायचा.

पण पूर्ण तहान भागायची,शर्ट वर करून किंवा शर्टच्या बाहीलाचं तोंड पुसायचं.

रेसीडेंसीमधे सुध्दा यात फारसा बदल झाला नाही.रुममधे पाण्याचा नळ हा कंसेप्टच नव्हता.अंघोळीच्या बादलीतच पिण्याचे पाणी भरून ठेवावे लागत असे.

शाळेत पायीच जाणारी आमची पिढी.सायकल म्हणजे चैन असणारा तो काळ.सायकल असली तरी सारखी सारखी चेन पडणारा तो काळ.ती चेन बसवताना नाकी नऊ यायचे आणि हाता बरोबर तोंड ही काळे व्हायचे.काळे हात मातीने पुसायचे,लईच भारी ! जुन्या सायकलच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात चालायचे.कुणाची सायकल विक्रीला आहे याचा शोध घेतला जायचा.दहा वेळेस भेटून,मध्यस्थ टाकून, घासाघीस करून मग किंमत ठरवली जायची.आधी मधुन हाफ पॅडल,मग हळु हळु टांग मारायची.मगच नंतर डबल सीट.….

MBBS करताना स्वत:ची ॲटलास सायकल असण्याची "श्रीमंती" माझ्याकडे होती.ती मी रेसिडेंसीपर्यंत जपली.मग तिची जागा Luna TFR ने घेतली.

दहावी पर्यंत सगळ्या वर्गाला पुढच्या वर्गातील हुशार मुलं माहिती असायची.चांगल्या स्थितीतील पुस्तके कुणाकडे सापडतील याचा दोन चार महिने आधीच शोध घेतला जायचा. ज्याच्याकडे पुस्तके असतील त्याच्या कडे चकरा मारल्या जायच्या आणि वशिला लावला जायचा.पुस्तके व्यवस्थितरित्या पाहिली जायची आणि मग त्यावर त्याची किंमत ठरवली जायची.शक्यतो निम्म्या किंमतीत व्यवहार ठरवला जायचा.पुस्तके मिळाली की स्वर्ग दोन बोटे उरायचा, कव्हर घालायला झिंग असायची....

माझी पॅथाॅलाॅजीची पुस्तके मी चंद्रकांत कोतकर या माझ्या ज्येष्ठाकडून निम्म्या किमतीत मिळविली होती.त्यासाठी त्याच्या व माझ्या तीर्थरूपांचा बालपणीचा "दोस्ताना" कामी आला होता.

आपल्या बालपणी जुन्या वह्या सगळ्या जपुन ठेवल्या जायच्या.वह्या वापरताना ही जपूनच वापरल्या जायच्या.

जास्तीत जास्त कोरी पाने ठेवली जायची.सगळी कोरी पाने वेगळी काढायची आणी मग ती एकत्र केली जायची. पुन्हा नव्याने एखादा प्रेसवाला शोधायचा आणि किंमतीची घासाघीस करून वह्या बाईंडिंग करून आणायच्या.त्यासाठी सतरा चकरा माराव्या लागायच्या. उद्या या, परवा या, अजुन झाल्या नाहीत, नंतर या, असं बरेच दिवस चालायचं.शेवटी एकदाच्या वह्या मिळाल्या की उड्या मारत घरी यायचं. एखादी वही पाहिजे असेल तर त्यासाठी आईकडून वशिला लावायचा.दहा वेळेस मागणी करावी लागायची.यातूनच नकार पचवायला शिकलो आणि सहनशीलताही वाढली.....

वैद्यकीय महाविद्यालयात वह्यांची जाग कागदाच्या दस्त्यांनी व जर्नल्सनी घेतली.क्लिप असलेल्या फाईलमधे कागदाच्या दस्त्यांमधील काही कागद टाकले की रोजचे काम भागायचे.

बालपणी वर्षभरात कपड्यांचे दोनच जोड मिळायचे.त्यातला एक शाळेचा असायचा तर दुसऱ्यासाठी दिवाळीच्या सणाची वाट बघावी लागायची.तो पर्यंत ठिगळ लावलेले शर्ट, चड्ड्या वापराव्या लागायच्या.चड्ड्या नेमक्या नको त्या जागेवरच फाटायच्या.त्यावर मग ठिगळ लावून घेतले जायचे.विशेष म्हणजे याचे कोणालाही काहीही वाटायचे नाही.दिवाळीचे कपडे मात्र जपून जपून वापरायचे.

वैद्यकीय महाविद्यालयात असताना देखील यात काही फार फरक पडलेला नव्हता.फक्त "ठिगळ" ची जागा बदलली होती.सीटवरचे "ठिगळ" आता घोट्यावर आले होते. कशासाठी ? तर "नॅरो बाॅटम" ची "बेल बाॅटम" करण्यासाठी !

मागितलं की हजर असं कुणालाच काही मिळाले नाही....

यातूनच नकार स्वीकारण्याची सवय लागली...

बरं त्या काळातील पालकांच्या मानसिकतेनुसार उच्च आर्थिक परिस्थितीतील घरातील पोरांनाही अशीच वागणूक होती.त्यात गरीब,श्रीमंत असा भेदभाव नव्हता.पोराचे सगळे मित्र माहिती असायचे, कुठे जातो, काय करतो यावर नजर असायची. चुकला की पहिले कानफटवले जायचे.उगाचच लई लाड नव्हते. कामापूरतेच कौतुक असायचे. त्यामुळे पोराचे पाय जमिनीवरच रहायचे.... मोठ्यांचा धाक होता,

दडपण होते.मान सन्मान होता.पोरगं इकडं तिकडं दिसलं तर दहा जण विचारायचे,काय रे ? तु अमक्याचा ना ? इकडे काय करतोस ? उलट उत्तरे देण्याची बिशाद नव्हती.... भरपूर मार खाऊन झाल्यावर उपाशीच झोपावे लागायचे.... घरातीलच एखादी आज्जी, आत्या, मावशी गुपचूप ताट आणून प्रेमाने जेवण भरवायची.पोरगं मुसुमुसु रडत रडत, एका हाताने डोळे पुसत पुसत चार घास खायचं आणि तिच्याच कुशीत झोपायचं.... दुसऱ्या दिवशी काल काय झालं हे विसरून पुन्हा आपल्या उद्योगाला लागायचं.आपण म्हणू तसेच होईल असे नाही हे पोराच्या लक्षात यायचे. त्याच्यात नकार पचवण्याची क्षमता आपोआपच निर्माण व्हायची.हे केले तर ते देईल अशी कुठलीही प्रलोभने नव्हती.

ताटात जे वाढले ते गुपचूप खावे लागायचे.कोणतेही नखरे चालत नव्हते, नाहीतर उपाशीच झोपावे लागेल हे माहिती होते....

वैद्यकीय महाविद्यालयांच्या मेसमधे तरी अशी काय वेगळी परिस्थिती होती ?

जगणं लुटूपूटुचं नव्हतं, खरं खरं जगणं होतं, आभासी जग नव्हतं, जिवाभावाचे मित्र होते, अवास्तव अपेक्षा नव्हत्या. कोणती स्वप्नं पाहायची याच भान होतं. पालकांनाही पोराचा वकुब माहिती असायचा, त्यामुळे त्यांच्याही अवास्तव अपेक्षा नसायच्या.

काळ बदलला आणि सगळंच बदललं,पण जीवनाच्या कोऱ्या कागदावर उमटलेले ते शाईचे डाग मात्र अजूनही तसेच आहेत....ते काही पुसता म्हणता पुसले जात नाहीत !

(शब्दसौजन्य -डाॅ.हरीश सरोदे,बी.जे.ची १९८६ तुकडी)

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page