"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 2 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १"
"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.पहा सर्वांना हे "विकृत समाधान" मिळते का ते !
आमच्या "BJMC 1973" गटात आरती प्रयाग सोडून कोणीच "विकृत" नाही ! त्यामुळे त्या गटात "विकृत" मित्रांबद्दल लिहीण्यात काहीच हशील नव्हता."B.J.Patho Meet" या विकृतांच्या गटात मी "गुरुवर्य" या गटात मोडतो. त्यामुळे लिहिण्यावर साहाजिकच बंधने येतात.तरी पण आज मंगलच्या आग्रहाखातर आपल्या डिपार्टमेंटच्या "नारायण" बद्दल दोन शब्द लिहीतो.जरूर वाचा !
"दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा" या वचनाप्रमाणे माझा काहीच दोष नसताना खुल्या गटातून मी आपल्या पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटला थेट आरक्षण कोट्यातला "लेक्चरर" म्हणून रूजू झाल्याने सर्वांच्याच रोषाला पात्र झालो होतो. त्यामुळे निवड समितीच्या बैठकीतून रागारागाने निघून आलेले "रणनवरे" सर "चाफा बोलेना,काही केल्या हसेना" थाटात केबिनमधे "गाल फुगवून" बसले होते.मी पण मग "गं गं गुस्सा इतना हसीन हैं तो प्यार कैसा होगा ?" म्हणत इरेला पेटलो व या "जमदग्नी" चे मन जिंकायचेच अशा प्रयत्नाला लागलो.
"रणनवरे" सरांनी रागारागातच माझ्या "जाॅईनिंग रिपोर्ट" वर सही केली व मला म्युझियमच्या दारातील वृक्षाखाली उभे रहाण्याची शिक्षा ठोठावली.तेथे श्रीमंत अडसूळ व भिकन सोनावणे आधीच तप करीत उभे होते.गेले महिनाभर आम्ही ऋषी वाल्मिकी सारखे अंगावर नुसतेच "वारूळ" वाढवत आहोत.पण आम्हाला कुणीच "पुसत" नाही अशी त्यांची तक्रार होती.
झाले तरी काय असे ? सतीश पाटील व विजय भंगाळे या दोन Chief व Senior Residents ना डावलून ते दोघे "लेक्चरर" म्हणून सर्वांच्या डोक्यावर येऊन बसल्याने सगळेच नाराज होते. मला म्युझियमच्या त्या "बोधीवृक्षा" खाली लगेच खालील "बोध" झाला की "आता यापुढे कठोर परिश्रमाला पर्याय नाही" !
त्यामुळे बोधीवृक्षाखालून निघालो तो तातडीने सतीश पाटील व विजय भंगाळे या दोघांना भेटलो.झाल्या प्रकाराबद्दल त्यांची मनापासून माफी मागीतली व त्यांनाच विचारले "अपराध माझा असा काय झाला ? का रे अबोला,का रे दुरावा" ? दोघेही खानदेशी जीभाऊ ! विजय तर खानदेशी केळ्यासारखे मृदू ! त्यामुळे माझी काहीच चूक नसल्याने तो लगेच द्रवला. त्यातच माझे मूळ पण खानदेशी ! मग काय ? "तुमचं आमचं जमलं" ! कसे ते सांगेन क्रमश: !






Comments