top of page

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ११"

  • dileepbw
  • Sep 1, 2023
  • 2 min read

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ११"

©दिलीप वाणी,पुणे

"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !

आपल्या पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटच्या नारायणाने म्हणजेच भुसावळच्या विजय भंगाळेने माझ्या MD परीक्षेच्या वेळी नारायणाची भूमिका चांगलीच वठवली होती.जरासंधवधाचा किस्सा व महाभारत महायुध्दाचा शेवटचा दिवस तुम्हाला सांगीतला.या लेखात MD परीक्षेच्या निकालाची नारायणाने केलेली "सांगता" सांगतो.

AFMC चे H.O.D. Dr.C.S.V.Subramaniyam व Histopathologist Dr.A.K.Banarjee यांच्या आग्रहाखातर निकालाच्या रात्रीच Officers Mess,AFMC मधे "हैदौस धुलाबे धुल्ला" साजरा झाला.आम्ही फक्त तिघे, मी,भंगाळे व बापट सर गेलो होतो.कारण BJMC ची पार्टी वेगळी करायचा धूर्त निर्णय नारायणाने घेतला होता.

AFMC ची "सामिष व समद्य पार्टी" लक्षात घेऊन नारायणाने तसेच नियोजन करायचे ठरवले.खरे तर हे BJMC संस्कृतीत बसत नव्हते.ही प्रथा फक्त "गुप्त"रोग तज्ञांमधेच "गुप्त" पणे "मळवली" च्या जंगलात चालू होती.आतापर्यंत पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटच्या घरगुती वातावरणात "शुध्द,सात्विक,तुपात तळलेल्या व साखरेत घोळलेल्या" पार्ट्या करायचीच प्रथा होती.जेथे "सरस्वतीचा वास" तेथे हा "कालीमातेचा वास

( ?दुर्गंध)" दरवळून कसा चालेल ?

शेवटी तोडगा निघाला ! "दृष्टीआड सृष्टी" करायचे घाटले ! लाल बहादूर शास्त्री रोडवरील "शिन गोखले वाडा" हे स्थळ मुक्रर करण्यात आले.नारायणाने "कृष्णशिष्टाई" करून AFMC चा "दारुगोळा", "शिन गोखले वाडा" येथे वळवला. मंडईतील "हाॅटेल दुर्गा" येथून वाड्यावर रसद पोहोचविण्यात आली.

रात्रौ नऊला तोफा धडाडल्या.पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचे सर्व "मावळे" गडावर पोहोचले.नौबती झडल्या.गेल्या तीन वर्षात या शिष्याच्या हजार चुका पोटात घातल्या,तशीच ही पण चूक पोटात घालतो असे म्हणत का होईना व "कुछ खाया न पिया,मगर इज्जतको तोडा" म्हणत आगरवालसर सुध्दा हजर झाले. सर्व महिलांची सोय "स्वारगेटा" वर जोशी मॅडमच्या घरी "पुरणपोळी" चा बेत ठेवून करण्यात नारायणाने "स्थानमहात्म्य" तर जपलेच शिवाय "समयोचितता" देखील दाखविली होती. असा हा नारायण ! "जो जे वांछील तो ते लाहो" म्हणणारा व तसे करणारा !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page