"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १७"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 1 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १७"
©दिलीप वाणी,पुणे
या लेखात मी १९८२ च्या पांचगणीच्या MAPCON परीषदेबद्दल माहिती सांगतो.जरूर वाचा.तिरस्थ ठिकाणी परीषद असल्याने एक आठवडाभर आधीच सर्व "बिनीचे शिलेदार" मोटारसायकलने पांचगणीला मोहिमेवर निघाले. त्यात प्रधान,गोखले,बापट हे ज्येष्ठ व भोरे,भोगे,नागधवणे, भिकन सोनावणे,मी व पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण डाॅ.विजय भंगाळे असे "बीनीचे शिलेदार" सहभागी होतो.
सकाळी दहाला पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटमधून निघालेली ही फौज मजल दरमजल करीत पार सूर्य मावळल्यावर महाबळेश्वरच्या MTDC Resort ला पोहोचली.रंग उडालेला काॅंन्फरन्स हाॅल पाहून आमचाच रंग उडाला.मुंबईचे पाहुणे काय म्हणतील ? सगळा हाॅल नव्याने रंगवून घ्यायचा असा निर्णय त्वरीत घेण्यात आला व त्याची "खलबते" करण्यासाठी सगळे "खलबतखान्यात" म्हणजे हनीमून काॅटेजेस मधे शिरले.दारूगोळ्याशिवाय या समस्येवर हल्ला कसा चढवणार ?
दिवसभर "रंगीत तालिम" झालेलीच होती.आता नाटकाचा "जाहीर प्रयोग" सुरू व्हायचा होता.जमादार कडे "साकी" चे काम दिले होते.तो इतका "कार्यमग्न" झाला की दोन-तीन तासांनंतर थेट अंतर्धान पावला.जेवायसाठी आम्ही उठलो तेव्हा हे लक्षात आहे. नाटकाचा "जाहीर प्रयोग" ज्या हनीमून काॅटेजमधे सुरू होता ते दरी काठावर उभे ठाकलेले असल्याने आमची एकच तारांबळ उडाली.पडली काय दरीत ?
तासभर शोधूनही "जमादार" काही सापडेना.आता मात्र पोलिस चौकी गाठायची वेळ आली.सगळ्यांची "उडालेली विमाने" क्षणात धावपट्टीवर उतरली.मग काॅटेजमधील टाॅयलेट पहायची सद्बुध्दि झाली.जमादारचे विमान तेथे लॅंड झालेले पहाताच आमच्या जीवात जीव आला व नाटकाच्या शेवटच्या अंकाला सुरूवात झाली.






Comments