top of page

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ९"

  • dileepbw
  • Sep 1, 2023
  • 1 min read

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग ९"

©दिलीप वाणी,पुणे

"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !

आपल्या पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटच्या नारायणाने म्हणजेच भुसावळच्या विजय भंगाळेने माझ्या MD परीक्षेच्या वेळी नारायणाची भूमिका चांगलीच वठवली होती.जरासंधवधाचा किस्सा तुम्हाला सांगीतला.या लेखात परीक्षेच्या शेवटाकडे नेतो.

तो १४ जानेवारी,१९८२ मकर संक्रांतीचा दिवस होता. सगळे "तिळगूळ घ्या-गोड बोला" चा गजर करीत एकमेकांना हलवा,तिळाचे लाडू,वड्या देत होते.आम्ही चौघे परीक्षार्थी (मी,अडसूळ व AFMC चे पनायच व शिरपाल) चार परीक्षकांचा (देवधर,मोघे,कर्नल आनंद व रायचूरसर) "ग्रॅंड व्हायव्हाचा तोफखाना" कसा झेलायचा या विंवचनेत होतो. त्यामुळे तिळगूळ काही केल्या गोड लागत नव्हता.

AFMC चे अख्खे डिपार्टमेंट संक्रांतीच्या मुहूर्तावर आमच्यावर संक्रांत कशी बरसते हे पहायला उत्सुक होते. त्यांनी चेअरमनकडे "ग्रॅंड व्हायव्हा" ऐकायची विनंती केली.नारायण पुन्हा मधे पडला.परीक्षार्थींची परवानगी घ्या असे म्हणाला.आम्ही एका अटीवर परवानगी दिली.आमच्या डोळ्यासमोर परीक्षकांशिवाय कोणीही नको.आमच्या पाठीमागे अख्खे पुणे शहर आमचा "तमाशा" पहायला उभे राहिले तरी आमची काहीच हरकत नाही !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page