
"रिटायरमेंट - हिसाब अपना अपना - भाग १"
- dileepbw
- Dec 3, 2023
- 2 min read
"रिटायरमेंट - हिसाब अपना अपना - भाग १"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! या बॅचने पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्याच नव्हे तर आपल्या महाविद्यालयाबाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.सर्वांचे अभिनंदन !
या वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनातील परीचयाच्या कार्यक्रमात बालरोगतज्ञ जगदीश ढेकणे याने व्यक्त केलेले मनोगत माझ्या मनाला फारच भावले.काय म्हणाला तो "निवृत्ती" बद्दल ? तो विचार सुध्दा माझ्या मनाला शिवत नाही.हॅटस् ऑफ !
"W" या वर्णमालेतील शेवटाकडच्या अक्षरामुळे माझा "परीचय" करून देण्याची वेळ आली तोपर्यत सगळे जण कंटाळून गेले होते.शिवाय "संध्याछाया" धूसर होऊ लागल्या होत्या.त्यामुळे फोटोग्राफरचा "गृपफोटो" साठी तगादा चालू होता.त्यामुळे मला माझा "परीचय" आवरता घ्यावा लागला होता.या लेखात करून देतो.
मला खरे तर वयाच्या ७० वर्षांपर्यत कार्यरत रहायचे होते. पण "युक्रेन वाॅर" सुरू झाले व तेथे अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले.त्यांना विनामूल्य शिकवण्याचा शासनाचा निर्णय खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर मोठाच आर्थिक बोजा टाकून गेला.त्यामुळे माझ्या वैद्यकीय महाविद्यालयातील वयाची ६५ वर्षे उलटून गेलेल्या अनेक प्राध्यापकांना सक्तीची निवृत्ती घ्यावी लागली.त्यात मी देखील होतो.
माझे व्यावसायिक आयुष्य अत्यंत "बिझी" होते ! चरितार्थासाठी "मेडीकेअर" नावाच्या तीन पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीज व पाच कलेक्शन सेंटर्स,सेवाकार्यासाठी "जनकल्याण" नावाच्या रक्तपेढ्यांची देशभर विखुरलेली रक्तपेढ्यांची साखळी व आंतरिक आवडीसाठी अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमधून रक्तपेढीविज्ञानाचे अध्यापन या व्यापातून लौकिक अर्थाने ज्याला "संसार" म्हणतात तो मी कधी केलाच नाही.तो तर माझ्या पत्नीने केला ! दोन अपत्यांबरोबर हे "तिसरे अपत्य" पत्नीने मनोभावे सांभाळले व आज देखील सांभाळते आहे.
२०२३ च्या ऑक्टोबर महिन्यात "हेमामालिनी" ७५ वर्षांची झाली. फिल्म इंडस्ट्रीत अतिशय यशस्वी कारकीर्द, नुसतीच यशस्वी नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीचा इतिहास लिहिताना ह्या "ड्रीमगर्ल" चा उल्लेख सिनेमा जगताला पडलेलं एक सुंदर स्वप्न असा करावाच लागेल. दोनेक पिढ्यांना आपल्या सौंदर्याने भुरळ घालणारी अफाट लोकप्रियता मिळवलेली ही अभिनेत्री. गेली दोन दशकं देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत ही खासदार म्हणून उपस्थिती ! थोडक्यात वयाच्या १६ व्या वर्षा पासून पंचाहत्तरी गाठे पर्यंत "सतत कार्यशील"
अशा ह्या 'स्वप्न सुंदरी' ला आता पुन्हा चित्रपटात काम करण्याची इच्छा झाली आहे. 'चांगली भूमिका मिळाली तर माझी आई पुन्हा चित्रपटात काम करेल' असं तिच्या मुलीने जाहीर केले आहे. हेमामालिनी ज्या पक्षाची खासदार आहे त्या पक्षात निवडणूक लढविण्यासाठी ७५ वर्षे वयाची अट असल्याने, पुढच्या वेळी निवडणूकीचे तिकीट मिळणार नसल्याने हेमामालिनी हिने हा निर्णय घेतला असावा कदाचित. थोडक्यात हेमाजी यांना "रिटायरमेंट" घ्यायची नाही.
माझे देखील हेमामालिनी व जगदीश ढेकणे यांच्यासारखेच मत आहे.कशावा घ्यायची निवृत्ती ? मी आज देखील "विद्यार्थी" असल्याप्रमाणे रोज चार तास वाचन व चार तास लेखन करतो.बाकीचा वेळ "चिंतन व मनन" करतो !






Comments