
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २५"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 2 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २५"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
"BJMC-1973 Batch" च्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनातील एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे लोणावळ्याच्या गुलाबी थंडीत आयोजित केलेली "शेकोटी" !
संध्याकाळच्या मनोरंजनाच्या सुनियोजित कार्यक्रमानंतर "साग्रसंगीत आचमना" चा व नंतर भरपेट भोजनाचा कार्यक्रम आटोपून काही मंडळी डुलतडुलत तर काही मंडळी डगमगत "शेकोटी"साठी पोहोचली. सुनियोजित कार्यक्रमात वेळ कमी पडल्यामुळे "शेकोटी" च्या कार्यक्रमात सर्वांना "मुक्त व्यासपीठ" उपलब्ध करून देण्यात आले होते.कुणीही उठा आणि काहीही करा !
मग काय ! "बाथरूम सिंगर्स" नी देखील घसा साफ करून घेतला.अंजली मंगरूळकर(दीप्ती वैद्य) यांनी तर कमालच केली. चक्क "ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु" या गीताचे विडंबनच सादर केले.सर्वांची हसून हसून पार मुरकुंडी वळवली. त्यातला देवानंद शेवटी एकच मुस्कटात खातो व हे विडंबन संपले.रेकाॅर्ड करायचा प्रयत्न केला.पण फारसे स्पष्ट रेकाॅर्डिंग झालेले नाही.पहा ऐकायला येते का !
या निमित्ताने "विडंबन" हा अलंकार समजावून सांगतो.मी बालपणी वाचलेला प्र.के.अत्रे यांचा विडंबन काव्य संग्रह म्हणजे "झेंडूची फुले" ! झेंडूच्या फुलांना जसा "गंध" नसतो तद्वत विडंबन काव्याला साहित्यिक मूल्य नसते.त्यामुळे अशा गीताला आणि विडंबनकारालाही आपल्या समाजात फारशी प्रतिष्ठा मिळालेली दिसत नाही.अशा परिस्थितीत अंजलीने "विडंबन गीत" हा मला आवडणार काव्य प्रकार सादर केल्याने मला खूप आनंद झाला.
या विडंबन गीताचे मूळ गीत व मला माहित असलेले विडंबन गीत पण तुम्हाला सांगतो.ऐका !
मुळ गाणे -
ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
की मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागीण सळसळली !
इथं कुणी आसपास ना !
डोळ्याच्या कोनात हास ना ?
तू जरा माझ्याशी बोल ना ?
ओठांची मोहोर खोल ना ?
तू लगबग जाता मागं वळून पाहाता
वाट पावलांत अडखळली
उगाच भुवई ताणून
फुकाचा रुसवा आणून
पदर चाचपून हातानं
ओठ जरा दाबीशी दातानं
हा राग जीवघेणा खोटा खोटाच तो बहाणा
आता माझी मला खूण कळली
आता याचे मला माहित असलेले विडंबन गीत ऐका !
"ही पाल तुरुतुरु, चढी भिंतीवरती हळु"
ही पाल तुरुतुरु, चढी भिंतीवरती हळु
वरच्या खिडकीतुन आत सरली !
की उंचावरच्या कप्प्यात, अडगळीच्या जागेत पालीण सळसळली !!
कोळ्यांशी मैत्री जमव ना !
जाळिशी फिल्डिंग लाव ना !
शेपुट वळ वळ कर ना!
डासांवरती झडप घाल ना !
मनी खालुन जाता वरं वळुन पाहाता,
पाल संकटात सापडली !!
उगाच झाडू हाणून !
फवारा हिटचा मारुन !
शेपुट चाचपुन काठीन !
तोंड जरा दाबुन चपलेन !
हा त्रास जिवघेणा , सारा माणसांचा बहाणा,
आता माझी इथली ह्द्द संपली !!
आमच्या पुणे-लोणावळा प्रवासात पक्या फडणीसने देखीलअसेच एक "विडंबित गीत" सादर करून ते सर्वांना त्याच्या पाठोपाठ म्हणायला लावले हौते.ते मूळ गाण्याच्या (बंबईसे आया मेरा दोस्त) वृत्तामधे म्हणजेच चाली मधे होते. पक्याने गण व मात्रांचा नियम पाळलेला असल्याने आम्हाला सर्वांनाच ते चालीत म्हणता आले.
पक्याच्या विडंबीत गीताची कडवी ही चांगलीच "अर्थपूर्ण" व विनोदप्रचुर होती. उगाच ओळींची खोगिरभरती नव्हती.सर्व कडवी ही एकमेकंशी संबंधीत होती.त्यामुळे "मामाची दुसरी पोरगी" पण आम्हाला सहज पटवता आली.पण त्यात केवळ विनोद होता.कुठलीही अश्लीलता किंवा बिभत्सता नव्हती. त्यामुळे आपली इव्हेंट मॅनेजर रूपाली देखील त्यात न लाजता सहभागी झाली.
व्यक्तिगत आकसापोटी कुणाही कवीची रचना मोडण्यास घेता कामा नये आणि विडंबित गीतातही व्यक्तिगत चिखलफेक टाळायला हवी.काव्याचा हेतु जर नवनिर्मिती आणि व्यक्तिगत अनुभवाची अभिव्यक्ती हा आहे, तर तोच हेतु विडंबनाचाही असावा.विडंबन हे अस्तित्वात असलेल्या एखाद्या गीताच्या चालीत बसणार व शक्यतो "विनोद" निर्माण करणार पण नवनिर्मित असंच काव्य असाव! ते जसे पक्याच्या विडंबित गीतात अनुभवता आल तसच ते अंजली मंगरूळकर(दीप्ती वैद्य) च्या विडंबित गीतात देखील !






Comments