
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४२"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४२"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाने माझ्या अनेक गतस्मृतींना उजाळा दिला.अपर डेकला माझा रूम पार्टनर होता उपेंद्र साठे ! हो तोच तो ! प्रभा गोखले मॅडमने युरिया क्लिअरन्स टेस्टच्या डेमोसाठी निवडलेला स्वयंसेवक ! ही घटना तो साफ विसरून गेला होता.म्हणून त्याला दुसर्या माझ्या आयुष्यातील "पहिल्या अपत्याचा जन्म" या मोठ्या घटनेची आठवण करून दिली.पण ती देखील तो विसरून गेला होता.आता सर्वांनाच सांगतो.निदान तुम्ही तरी विसरू नका !
शीला गोळे(शिंत्रे) ही उपेंद्र साठेची वहिनी आहे हे किती जणांना माहित आहे ? शीला गोळेचे यजमान डाॅ.माधव शिंत्रे व आपला उप्या ही आते-मामे भावंडे ! त्यांच्या गाडीत माझी बालमैत्रीण मंगलप्रभा कशी ? हे मला न उलगडलेले कोडे आहे.शेवटी काय तर "दुनिया गोल हैं" !
आता माझ्या "पहिल्या अपत्याचा जन्म" ही "चित्तरकथा" ऐका ! माझी पत्नी माझ्या आग्रहाखातर गरोदर अवस्थेतच बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात "प्रयोगशालेय नैदानिक विद्या (DMLT)" शिकत होती.गरोदरपणामुळे तिच्या बर्याच "दांड्या" व्हायच्या. त्यामुळे आपल्या "विद्या शर्मा" मॅडम मलाच शिव्या घालायच्या.तुला कसली रे एवढी घाई झाली होती म्हणून चिडवायच्या ! खरे तर घाई पत्नीला झाली होती.मला नाही.पण त्यांना हे सांगणार कोण ? असो.
CCL मधे BSL करत असतानाच तिच्या मेंम्ब्रेन्स लीक झाल्या. पहिलीच खेप असल्याने तिने गडबडून मला फोन लॅबमधे केला.मी तिला रिक्षा करून शीला गोळे(शिंत्रे)कडे यायला सांगीतले व मी आधीच तिथे पोहोचलो.उप्या,शीला व माधव शस्त्रे-अस्त्रे परजून तयार होते.रुग्णालयाचे शेजारच्याच नवीन जागेत स्थलांतर चालू असल्याने निम्मे साहित्य नागनाथपाराजवळ शेजारच्याच जुन्या इमारतीत होते.त्यामुळे माझी अवस्था इकडून तिकडे हेलपाटे मारणार्या "शिंगरा" सारखी झाली होती.शेवटी "मध्यानी" च्या ठोक्याला माझ्या चिरंजीवांनी "ट्यॅहॅ" केले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.






Comments