"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६"
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन" म्हणजे गुरूजनांचे "स्मरण" व त्यांचा "सत्कार" करायचा दिन ! सत्तरीला टेकलेल्या विद्यार्थ्यांचे गुरूजन काय वयाचे असणार ? त्यांना स्नेहसंमेलनस्थळी आणण्यासारखी परिस्थिती असेल का ? या सर्व गोष्टींचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला व गुरूजनांच्या घरी जाऊन त्यांचे आशिर्वाद रेकाॅर्ड करून ते सर्वांना स्नेहसंमेलनात ऐकवायचे असे ठरले.
"BJMC-1973 Batch" चे नशीबच थोर ! वैद्यकीय महाविद्यालयातले या बॅचचे "प्रथम गुरू" म्हणजे त्यावेळचे अधिष्ठाता मा.डाॅ.गुरूराज मुतालिक ! आज त्यांचे वय ९४ ! वास्तव्य अमेरिकेत ! आज ही कार्यरत ! त्यांचे मार्गदर्शन आजही "खणखणीत" व "झणझणीत" ! डोळ्यात "अंजन" व मेंदूत विचारांचे "थैमान" घालणारे ! जरूर ऐका.पुन्हा पुन्हा ऐका !
दिवगंत "गुरूजनांचे स्मरण" कसे व कोणी करायचे ? पुन्हा "आधुनिक तंत्रज्ञान" कामी आले."BJMC-1973 Batch" चा "स्टार विद्यार्थी" राजीव मोतीवाला या असामान्य विद्यार्थ्याने सर्व गुरूजनांना फोटोंच्या माध्यमातून "आदरांजली" वाहिली.दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असल्याने त्याच्या भाषेत एक प्रकारचा "अमेरिकन भारदस्तपणा" आलेला आहे हे शब्दागणी जाणवत त्या काळात विक्रमी गुण प्राप्त करून SSC बोर्डाच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेला, निसर्गाकडून बुध्दीचे अप्रतिम वरदान मिळालेला विद्यार्थी ! आर.सी.एम.विद्यालयातील गुजराती माध्यमातून बालशिक्षण घेतलेला हा विद्यार्थी उच्च मराठी माध्यम असलेल्या नू.म.वि.चा विद्यार्थी होतो काय अन् SSC बोर्डाच्या परीक्षेत मराठी विषयात देखील सर्वप्रथम येतो काय हे सर्वच मला तरी अनाकलनीय ! "प्री-प्रोफेशनल" ही जीवनातली एक महत्वाची परीक्षा ! त्या परीक्षेत "A" group घेऊन "IIT ian" व्हायचे स्वप्न पहाणार्या या असामान्य बुध्दीच्या विद्यार्थीचे सहा महिन्यात "मतपरिवर्तन" होते काय अन् नंतर "B group" घेऊन देखील पुणे विद्यापीठात सर्वप्रथम येतो काय ! सारेच अनाकलनीय ! अशा या "अतिविशिष्ट व्यक्ती" ने Final MBBS च्या परीक्षेत घेतलेला "ड्राॅप" आधीच त्याच्या भोवती असलेल्या "गूढतेच्या वलया" त भर घालणाराच होता ! ॲनाटाॅमीच्या प्राध्यापिका मा.डाॅ.लता मेहता यांच्या प्रत्येक व्याख्यानात त्याचे कौतुक असायचे ! त्यामुळे माझ्या मनात आधीच त्याच्याबद्दल असलेल्या गुढतेत भरच पडत गेली.


Comments